बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत
दोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण
बीड (रिपोर्टर)- बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी प्रचंड उपद्रव माजवला असून कुत्रे नागरिकांवर हल्ले करू लागले. दोन दिवसांमध्ये तब्बल साठ ते सत्तर जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, अशी मागणी केली जावू लागलीय.
बीड शहरातल्या विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली, हे कुत्रे लहान मुलांसह नागरीकांना चावा घेऊ लागले. कुत्र्याचां बंदोबस्त करावा, अशी सतत मागणी नगरपालिका प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे मात्र नगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाही. दोन दिवसांमध्ये तब्बल साठ ते सततर जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने शहरात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. चावा घेतलेल्या सर्व नागरिकांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेतले आहेत. दरम्यान, कुत्र्याने चावा घेतलेले नागरीक गांधीनगर, शाहूनगर, बलभीमनगर, केएसके कॉलनी,
धांडेनगर, पिंपळगव्हण रोड, राजूनगर, मोमीनपुरा, रायगड कॉलनी, ढोर गल्ली, अंकुशनगर, सिद्धेश्वर नगर, शहेंशाहनगर, पालवण चौक, चाणक्यपुरी, जिजामाता चौक, मित्रनगर, तुळजाई चौक, संस्कार चौक, इस्लामपुरा, पंचशीलनगर, छापखाना गल्ली, खासबाग, धानोरा रोड यासह आदी परिसरातील नागरीक आहेत.
सभेदिवशी अनेकांना कुत्र्यांनी घेतला चावा
बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आयोजीत करण्यात आली होती. शहरामध्ये हजारो नागरीकांची सभेसाठी उपस्थिती होती. सभा संपल्यानंतर अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याचे सांगण्यात आले. सभास्थळीही कुत्रे घुसले होते.