सरकारचा निषेध; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महिलांची माफी मागावी
गेवराई (रिपोर्टर): सराटे अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई तालुक्यातील अवघा मराठा एकवटला, शहरातल्या संभाजी चौकात तालुकाभरातून आलेल्या मराठा समाजाच्या बांधवांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला. पुढे आंदोलकांनी रस्तारोको आंदोलन करून ठिय्या मांडला. नंतर हा दहा हजाराच्या आसपासचा सामज आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी थेट सराटे अंतरवलीकडे निघाला.
गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावांनी सहभाग नोंदवला होता. काल सराटे अंतरवलीत पोलीसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला झाला. अनेक महिला आंदोलक आणि पुरुष आंदोलक जखमी झाले, याचे तिव्र पडसाद गेवराई सह तालुक्यात उमटले. आज तालुकाभरातील गावागावातून हजारोंच्या संख्येने समाज गेवराई शहरात डेरेदाखल झाला. संभाजी चौकात एकत्रित येवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी जावून महिलांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.