गेवराई (रिपोर्टर): अज्ञात तीन चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरामधील महिला पुरुषांना मारहाण, दाबदडप करत सोन्या-चांदीची लुटालूट केल्याची घटना लक्ष्मीपुजनाच्या मध्यरात्री गेवराई तालुक्यातील तांदळा येथे घडली. या वेळी चोरट्यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावला तर अन्य दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. चोरट्यांच्या मारहारीत दोघे जण जखमी झाले असून या प्रकरणी प्रकाश डोंगरे यांच्या तक्रारीवरून चकलांबा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तांदळा येथील प्रकाश प्रल्हाद डोंगरे हे दिपावली दिवशी लक्ष्मीपुजन करून घरात झोपले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. प्रकाश डोंगरे व त्यांच्या पत्नी ज्या खोलीमध्ये झोपले होते. त्या खोलीत तोंड बांधलेले दोन चोरटे दाखल होत डोंगरे यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकु लावला. तर दुसर्याने कपाटामध्ये 13 ग्रॅम सोन्याची पोत यासह अन्य ऐवज चोरून नेला. याच दरम्यान चोरट्यांनी अंजना रमेश गायकवाड, रमेश गायकवाड या दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या जवळीलही सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेने तांदळा परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी प्रकाश डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिसांनी गु.र.नं. 320/2023 कलम 357, 392, 394, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल केला आहे.