बीड (रिपोर्टर): शिक्षक दाम्पत्य आपल्या मुलाला लातूर येथील शाळेत सोडण्यासाठी बसमधून जात असताना बसस्टँड ते शिवराज पान सेंटर या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदरील शिक्षकाचे पाकिट मारत खिशातून नगदी आठ हजार रुपयांसह पत्नीचे काढून ठेवलेले दागिने असा एकूण 84 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अजित लोंढे या शिक्षकाच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील शिक्षक अजित नारायण लोंढे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या परिवारासह बीड शहरातल्या शिंदेनगर भागामध्ये राहतात, परवा दुपारी ते त्यांचा मुलगा लातूर येथे शिक्षण घेत असल्याने त्याला सोडण्यासाठी लातूरकडे निघाले, बीड बसस्थानकात आल्यानंतर त्यांनी बीड-लातूर या एसटी बसमध्ये प्रवास सुरू केला, बसस्थानकापासून सदरची बस ही शिवराज पान सेंटरपर्यंत आली तेव्हा लोंढे यांना आपला खिसा मारल्याचे लक्षात आले. प्रवासाच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीचे मिनी गंठन, कानातील वेल, अंगठी असे सोन्याचे दागिने एका डब्बीमध्ये ठेवून स्वत:कडे घेतले होते. चोरट्यांनी त्या दागिन्यांसह नगदी आठ हजार रुपयांवर डल्ला मारला. तब्बल 84 हजार रुपयांचा फटका संबंधित शिक्षकाला बसला. या प्रकरणी अजित लोंढे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.