बीड(रिपोर्टर): जिल्ह्यात दबंग कारवाईने चर्चेत असलेले आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदी नियूक्ती झाल्यानंतर अचानक त्यांची तेथील नियूक्ती स्थगित करण्यात आली आहे. अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार यांनी काढलेल्या पत्रात पंकज कुमावत यांना वगळून अन्य अधिकार्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे सुतोवाच केले आहे. कुमावत यांच्या नियूक्तीला स्थगिती मिळाल्याने कर्तव्यदक्ष अधिकार्याला काम करू द्यायचे नाही का? असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी बीड जिल्ह्यात दबंग कारवाया केल्या. गुटखा, दारू यासह अन्य अवैध व्यवसाय उद्ध्वस्त करत माफियांच्या उरात धडकी भरवली. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अनेक कारवायांमध्ये गुन्हेगारांवर कुमावत यांचा चांगला वचक बसला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामध्ये पंकज कुमावत यांना अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदी नियूक्त करण्यात आले होते. मात्र पुन्हा अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरिनिशी शासन आदेश पारित झाला. त्यामध्ये नियंत्रण अधिकारी यांनी श्री पंकज कुमावत भापोसे यांना वगळून इतर अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता तात्काळ कार्यमुक्त करावे व त्यानंतर संबंधीत अधिकारी यांनी बदलीच्या पदावर पदग्रहण अवधी न उपभोगता बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे असे त्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कुमावत यांच्या अंबाजोगाई येथील नियूक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.