अमरावती (रिपोर्टर):- भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे त्यांच्या पक्षात खच्चीकरण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. त्यातच काही दिवसांपूर्वी पंकजा यांनी त्यांना चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने लक्ष वेधून घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजाताई फक्त शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते आणि कधी गंभीर झाल्या तरी बातमी होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला जातो. तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
आपल्याला चष्मा लागला असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिली होती. याच व्हिडिओत त्यांनी उपरोधिकपणे भाष्य केल्याने सदर व्हिडिओ सर्वत्र चर्चा झाली. ताईला चष्मा लागला. लांबचा चष्मा नाही बरं का, हा जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. पण ते आता स्पष्ट दिसायला लागेल, असं पंकजा यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.