बीड (रिपोर्टर): श्रीक्षेत्र कपिलधार या ठिकाणी मन्मथस्वामी देवस्थानची कार्तिकी एकादशीच्या अनुषंगाने महापुजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारीबीडमध्ये येत असून प्रशासन त्यादृष्टीने कामाला लागले आहे.
3 डिसेंबर रोजी परळी येथे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील काही सहकारी येत असतानाच तत्पूर्वी श्रीक्षेत्र कपिलधार या ठिकाणी प्रत्येक वर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आंध्रा, कर्नाटक आणि बीड या ठिकाणाहून अनेक भाविक-भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात. देशातील लिंगायत समाजाचे मन्मथ स्वामी हे दैवत आहेत. त्या अनुषंगाने मन्मथ स्वामींच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येण्याचे निमंत्रण देवस्थान आणि इतर लिंगायत समाजाच्या प्रतिष्ठीत लोकांनी दिल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी कपिलधार या ठिकाणी येण्याचे निश्चित केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत मुख्यमंत्र्यांचा दौरा अद्याप आला नसला तरी मुख्यमंत्री कार्यालयाने दूरध्वनीवर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने प्रशासन त्यांच्या दौर्याच्या तयारीत लागलेले आहे.











