आष्टी (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात प्रस्थापीतांविरोधात प्रचंड लाट असल्याचे लोकसभा निवडणुकीत निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन चेहर्यांना संधी देण्याची घोषणा केली, त्यानुसार मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी चाचपणीही केली. आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गेल्या कित्येक वर्षापासून समाजकारणासह राजकारणात सक्रिय असलेल्या तरटे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. अमोल तरटे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने अमोल तरटे हे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत अवघे प्रस्थापीत महायुतीकडे असताना केवळ मतदारांच्या जोरावर महाविकास आघाडीचा उमेदवार बीड जिल्ह्यात निवडून आला. आष्टी-पाटोद्याचं राजकारणही प्रस्थापीतांच्या भोवती सातत्याने फिरतं, तरटे कुटुंब सातत्याने समाजकारणासह राजकारणात गेल्या चार दशकांपासून सक्रिय आहे. कमलताई तरटे यांचे सामाजिक, राजकीय आणि सर्वसामान्य कष्टकर्यांसाठीचे कार्य दखलपात्र आहे. त्यांचे चिरंजीव गेल्या पंधरा वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून समाजकारणासह राजकारण करताना अमोल तरटेंनी सातत्याने विकासाचा दृष्टीकोन ठेवला आहे. आतापर्यंत ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचे, मात्र मध्यंतरी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. एकीकडे शरद पवार यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नवतरुण आणि नवीन चेहर्यांना संधी देण्याची घोषणा केली, पवारांच्या अपेक्षीत उमेदवारांच्या यादीत अमोल तरटे यांचं नाव चर्चेत आहे. पवारांना सोडून जे लोक गेले, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही, अथवा त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, असे पवारांच्या राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितले जाते. अशा परिस्थितीत आणि मतदारसंघाची मानसिकता पाहता पवारांच्या राष्ट्रवादीला अमोल तरटे हा चेहरा चांगला मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल तरटे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून त्या दृष्टीने अमोल तरटेंनी कामही सुरू केले आहे.