राज ठाकरे मुक्कामात म्हणाले, पक्षाची बांधणी करा, पाच तालुक्यात अध्यक्ष नाही, सहा मतदारसंघातले उमेदवार एक तारखेनंतर घोषीत करू
बीड (रिपोर्टर): मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल बीड मुक्कामी राहत कार्यकर्त्यांशी संवाद साधून सहाही मतदारसंघात उमेदवार देण्याचे एकीकडे स्पष्ट केलेले असतानाच दुसरीकडे बीड जिल्ह्यातला एक माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष उमेदवारीसाठी राज ठाकरेंना गळत घालत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते. या दोघांनी आपले प्रोफाईल मनसेकडे पाठवल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या मनसेचा म्हणावा तेवढा प्रभाव बीड जिल्ह्यात दिसून आला नाही. शे-दोनशे कार्यकर्ते जिल्हाभरात पहावयास मिळाले. परंतु ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून त्यांच्या गाडीवर सुपार्या फेकण्यात आल्याने बीडचा दौरा चर्चेत राहिला.
मनसेप्रमुख राज ठाकरे हे मराठवाडा दौर्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. काल ते बीडमध्ये डेरेदाखल झाले. सुपार्या फेकल्याचा वाद वगळता राज ांकरेंनी रात्री बीड मुक्काम पसंत केला. रात्रीच्या वेळेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या वेळी कार्यकर्त्यांना, जिल्हाध्यक्षांना काही प्रमाणात सुनावण्यातही आलं. तुमची पक्षाची बांधणी नाही, ती करा, जिल्ह्यात अकरा तालुके आहेत, परंतु पाच तालुक्यात मनसेचे अध्यक्षच नाहीत, यावरही चर्चा झाली. आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, परंतु ती उमेदवारांची घोषणा एक तारखेनंतर करणार असल्याचे राज यांचं म्हणणं होतं. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. मनसेकडे अन्य पक्षातल्या दोन नेत्यांनी उमेदवारी बाबत इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जाते. केज मतदारसंघातल्या माजी आमदाराने आपली प्रोफाईल राज ठाकरेंकडे पाठवल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. मी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे, पक्षाने उमेदवारी दिली नाही तर मी मनसेच्या तिकिटावर लढर्यास तयार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर इकडे बीडमध्ये एक माजी नगराध्यक्षाने आपली प्रोफाईल मनसेकडे पाठविली आहे. त्यांनीही बीडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संबंधित माजी नगराध्यक्ष हा आतापर्यंत दोन-चार पक्षात फिरून आलेला असून आगामी विधानसभा निवडणूक ही मनसेकडून लढवू इच्छीत असल्याचे सांगितले जाते.