चार दिवसात खुनाची दुसरी घटना, माजलगावमध्ये खळबळ, हल्लेखोरांमध्ये माजलगाव कारखान्याच्या माजी संचालकाच्या दिवट्या चिरंजीवाचा समावेश, सहाही आरोपी फरार, धाबा मालकाचा मुलगाही गंभीर जखमी,
माजलगाव (रिपोर्टर): भाजपा पदाधिकार्याची हत्या होऊन चार दिवसही उलटून गेले नाही तोच माजलगाव शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर दोन हजार रुपयांसाठी धाबा मालक व त्याच्या मुलावर सहा जणांनी हल्ला चढवला. सहा जणांच्या टोळक्याने हातात येईल त्याने धाबा मालक व त्याच्या मुलास बेदम मारहाण केली. यामध्ये धाबा मालक महादेव गायकवाड व त्यांचा 22 वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झाला. त्यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. चार दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्ला करणार्या टोळक्याचा म्होरक्या हा माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव थावरे यांचा दिवट्या चिरंजीव रोहीत शिवाजीराव थावरे असल्याचे सांगितले जाते. रोहीतसह अन्य पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मरण पावलेले महादेव गायकवाड यांच्या जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.

गेल्या चार दिवसांपूर्वी माजलगाव शहरात भाजपाच्या पदाधिकार्याची दिवसाढवळ्या भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने उभा महाराष्ट्र हादरून गेला होता. त्या निर्घृण हत्येचे रक्त अजून वाळलेलेही नसेल तोच माजलगाव शहरापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या नागडगाव पाटी कॉर्नरवर पुन्हा एक निर्घृण हत्या झाली. याठिकाणी माजलगावच्या मंजरथ रोडवर राहणारे महादेव गायकवाड यांचा गावरान धाबा आहे. काल नेहमीप्रमाणे महादेव गायकवाड संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर बसले होते. तेवढ्यात माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एक टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी खाणपान केलं दोन हजार रुपये बिल झाले. बिलाच्या वादातून महादेव गायकवाड व त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि त्या टोळक्याने धारदार शस्त्राने महादेव गायकवाड यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा मुलगा आशुतोष महादेव गायकवाड हा तेथे आला तेव्हा या हल्लेकोरांनी त्याच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात महादेव गायकवाड आणि आशुतोष गायकवाड हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तेथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र महादेव गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र त्यांचा उपचार घेताना आज दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा आशुतोष याच्यावर उपचार सुरू आहेत.

माजलगावमध्ये अवघ्या चार दिवसात खुनासारख्या दोन गंभीर घटना घडल्या. गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्या टोळक्याच्या म्होरक्याची ओळख पटली असून तो माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव थावरे यांचा चिरंजीव रोहित शिवाजीराव थावरे हा आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणातील फरारी आरोपींचा शोध घेत आहेत. घटना घडल्यापासून आरोपी फरार असल्याचे सांगितले जाते.
अवैध दारू विक्री वाढली
सरस्वत तालुका परिसरात जवळपास 90 च्या वर धाबे असून या धाब्यावर अवैधरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या आशीर्वादाने ही दारू विक्री सुरू आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवाजी थावरे आ. सोळंकेंचे खंदेसमर्थक
महादेव गायकवाड या धाबा चालकावर आणि त्याच्या मुलावर हल्ला करणार्या टोळक्याचा जो म्होरक्या रोहीत शिवाजीराव थावरे हा आहे. त्याचे वडिल शिवाजी थावरे हे माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे 25 वर्षे संचालक राहिलेले आहेत. सध्या ते माजी संचालक असून गेल्या तीस वर्षांपासून आ. सोळंके याचें ते खंदे समर्थक आहेत. इथल्या हल्ल्यात आणि हत्येत आरोपी थावरे याला राजकीय टच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.







