
बर्दापूरसह नांदेड जिल्ह्यात केल्या होत्या चोर्या
बीड (रिपोर्टर): बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन चोरीच्या घटना जानेवारी महिन्यामध्ये झाल्या होत्या. या चोरी प्रकरणातील आरोपी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात असल्याची गुप्त माहिती स्थानीक गुन्हे शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी काल या दोन आरोपींना ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांनीनांदेड जिल्ह्यासह इतर ठिकाणी चोर्या केलेल्या आहेत.
जानेवारी महिन्यामध्ये बर्दापूर येथे तीन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या चोरी प्रकरणातील आरोपी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स येथे थांबले असल्याची गुप्त माहिती स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलीसांना झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना पकडण्यात आले. यामध्ये शेख इरफान मुनीर (वय 31 वर्षे) व मुस्तफा कासीम पठाण (वय 27 वर्षे) रा. पानगाव ता. रेणापूर जि. लातूर यांचा समावेश आहे. या दोघांना बर्दापूर पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले असून त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या दरोडेखोरांनी नांदेड येथे तीन, नांदेड ग्रामीणमध्ये एक, रेणापूर येथे एक आणि परळी येथे एक चोरीचा व दरोड्याचा गुन्हा केलेला आहे. सदरील ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, चेतना तिडके, शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर मुरकुटे, विकास राठोड, राहुल शिंदे, नितीन वडमारे, अशफाक सय्यद, मनोज परझने, नारायण कोरडे यांनी केली.








