
आदिवासी मुलीवर दहा वर्षे बलात्कार
बलात्कार्यासह कुटूंबियांवर गुन्हे दाखल
मस्साजोग, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सवर्ण समाजातील तरुणाने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दहा वर्षांपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे.या घटनेतील आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील केजमधील एका गावात, दहा वर्षांपूर्वी सवर्ण समाजाच्या संभाजी दत्तू ढगे नावाच्या तरुण नराधमाने पीडित आदिवासी अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवत , तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित मुलगी सुज्ञान झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी समाजातील तरुणासोबत लावून दिले.
पीडितेचे लग्न झाले असतानाही आरोपी संभाजी ढगे तिचा पाठलाग करत होता . तो तिच्या सासरी जाऊन तिच्या नवर्याला मारहाण करून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार करत होता, तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही देत होता. या अत्याचारातून ती तरुणी गरोदर राहिली. ही बाब सासरच्या लोकांना माहिती होताच त्यांनी तिला माहेरी आणून सोडले.
जात दाखवून घराबाहेर काढले
आरोपी आणि कुटुंबाच्या छळाला कंटाळून पीडितेच्या नवर्याने विषारी द्रव्य प्राशन करून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केल्याचे उघड झाले आहे. सात महिन्यांची गरोदर असलेली पीडिता माहेरी परतल्यानंतर ती आरोपी संभाजी ढगे याच्या घरी राहिली आणि तिने लग्नाचा हट्ट धरला. परंतु, गरोदरपणाचे कारण देत आरोपीने लग्नास टाळाटाळ केली. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळ ढगे कुटुंबाने मुलाचा सांभाळ केला. मात्र, काही दिवसांनी आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला कामधंद्यासाठी बाहेरगावी पाठवले. त्यानंतर आरोपीचा भाऊ आणि आई-वडील यांनी तू हलक्या जातीची आहेस असे बोलून त्या आदिवासी तरुणीला तिच्या लहान बाळासह घराबाहेर हाकलून दिले. आरोपी संभाजी ढगे यानेही ’आदिवासी असल्याने’ लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
वर्षभर वाट पाहूनही आरोपीने लग्न न केल्याने पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठले. दि. 15 ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी संभाजी दत्तू ढगे याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 376 (3) (बलात्कार), 366 सह पोक्सो कायद्याचे कलम 4, 6, 8 तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम 3(2), 3(व्ही), 3(1) (डब्ल्यू) (ळ), 3(1) (एक्स व्ही) (ळळळ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास नव्याने रुजू झालेले आयपीएस अधिकारी व्यंकट राम खाझड हे करत आहेत. पीडितेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे केज दौर्यावर आले असता त्यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली होती.








