मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली.
उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता अजित पवारांकडे असलेली सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करत सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
त्यामुळे पुणे-बीड जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात आपल्या कार्यालयात कार्यभार स्वीकारणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. बारामतीकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला आपुलकीने निरोप दिला, तर बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी अल्पावधीतच बीडकरांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेनेही बंद पाळून श्रद्धांजली वाहिली होती. आता अजित पवारांनंतर बीड जिल्ह्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने बीडकरांच्या अपेक्षा त्यांच्याकडे लागल्या आहेत.










