माजलगाव (रिपोर्टर) : माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वारोळा गावात राहत्या घरातून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड व माजलगाव ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एजंटसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव (AHTU, बीड) यांना दिनांक २० मार्च २०२६ रोजी दुपारी गुप्त बातमीदारामार्फत वारोळा येथे बाहेरील जिल्ह्यातील महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर परी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुलकुमार यांनी छापा टाकण्याचे आदेश दिले.
यानुसार माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुलकुमार व पोउपनि पल्लवी जाधव यांनी पथकासह डमी ग्राहक व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. डमी ग्राहकास संबंधित ठिकाणी पाठविल्यानंतर तेथील महिला एजंटने वेश्या गमनासाठी ५०० रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर पोलिसांना इशारा देण्यात आला आणि तत्काळ छापा टाकण्यात आला.
छाप्यात पैसे स्वीकारणारी महिला अलका हडागळे (रा. वारोळा, ता. माजलगाव, जि. बीड) हिला ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष झडतीदरम्यान डमी ग्राहकाने दिलेली ५०० रुपयांची नोट जप्त करण्यात आली. घटनास्थळी दोन पीडित महिला आढळून आल्या. चौकशीत एक महिला परभणी येथील असून रामा गायकवाड (रा. वारोळा) याने फोन करून बोलावल्याचे सांगितले, तर दुसरी महिला छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे समोर आले. प्रत्येक ग्राहकाकडून ५०० रुपये घेऊन त्यापैकी ३०० रुपये महिलांना दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता १२ वापरात नसलेले निरोध जप्त करण्यात आले. आरोपी अलका हडागळे व रामा गायकवाड हे महिलांना आर्थिक फायद्यासाठी बोलावून त्यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुलकुमार, पोउपनि पल्लवी जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, महिला पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस हवालदार अशोक शिंदे, प्रदीप येवले, संजय राठोड तसेच पोलीस शिपाई आकाश कारले, विकास वाघमारे, विठ्ठल चव्हाण व AHTU व माजलगाव ग्रामीण पोलीस पथकाने केली.









