बीड (सतीश गायकवाड) :
पेठ बीड परिसरात जनावरे चोरी करून कत्तलीसाठी नेत असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे २० एप्रिल २०२६ रोजी स्टाफसह पेठ बीड हद्दीत गस्त घालत असताना त्यांना मोबाईलवर माहिती मिळाली की, जी. एन. फंक्शन हॉलजवळ काही नागरिकांनी जनावरे चोरणाऱ्या संशयितांना पिकअप वाहनासह पकडले आहे. माहिती मिळताच खेडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अतिरिक्त पोलिस पथकही बोलावून घेतले.
घटनास्थळी एका बोलेरो पिकअप (क्र. एमएच-२३ एयू १०१५) वाहनात गोवंशीय जनावरे आढळून आली. ही जनावरे अत्यंत क्रूरपणे चारही पाय बांधून ठेवलेली होती. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे पेठ येथे आणले.
चौकशीत आरोपींनी ही जनावरे चोरी करून कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशीम जाफर कुरेशी, अजिम आझाद कुरेशी (दोघे रा. महमदीया कॉलनी) व शहनवाज कुरेशी एजाज (रा. कुरेशी मोहल्ला, पेठ बीड) अशी आहेत.
या प्रकरणी फिर्यादी सईद अब्दुल करीम कुरेशी (वय ५१, रा. मोमीनपुरा) यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार नितीश माने करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, उपनिरीक्षक मन्सूर शहा तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.








