; परिसरात चर्चांना उधाण
केज : ऑनलाईन रिपोर्टर
“प्रेम आंधळं असतं” या म्हणीची प्रचिती देणारी घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चार मुलांची आई असलेली विवाहित महिला आपल्या तीन मुलांना घरी सोडून एका लहान मुलाला सोबत घेत शेजारी राहणाऱ्या विवाहित प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे.
माहितीनुसार, संबंधित महिला ही २६ वर्षीय असून तिला चार मुले आहेत. ती आपल्या घराशेजारी राहणाऱ्या भावकीतील २७ वर्षीय विवाहित युवकाच्या प्रेमात पडली होती. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित युवक देखील विवाहित असून तो दोन मुलांचा पिता आहे. दोघांनीही आपल्या संसाराचा, मुलाबाळांचा तसेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार न करता घर सोडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
सदर महिला घरातून निघताना तीन मुलांना घरी ठेवून एका लहान मुलाला सोबत घेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर दोन्ही कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र दोघांचाही कुठेही ठावठिकाणा न लागल्याने अखेर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र बेपत्ता तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान, या घटनेची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून, नातेसंबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक मूल्यांबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस दोघांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.









