बीड | रिपोर्टर
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९१ लाख ३१ हजार २४२ रुपयांचे १ लाख १८ हजार ९४० किलो निकृष्ट व भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ६ आणि ७ ऑगस्ट रोजी बीड एमआयडीसी, वडवणी आणि माजलगाव येथे ही धडक कारवाई करण्यात आली.
बीड एमआयडीसीतील मे. स्वागत ऑईल इंडस्ट्रीज आणि मे. चरखा ऑईल मिल येथे टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार समोर आला. सोयाबीन आणि पामतेल एकाच टाकीत भरून त्याच तेलाला रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशी वेगवेगळी लेबले लावून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले. याशिवाय गंजलेल्या जुन्या डब्यांचा पुनर्वापर, अत्यंत अस्वच्छ साठवणूक टाक्या, इन-हाऊस प्रयोगशाळेचा अभाव तसेच फूड ग्रेड प्रमाणपत्र नसल्याचे गंभीर प्रकारही निदर्शनास आले.
या कारवाईत स्वागत ऑईल इंडस्ट्रीजमधून १ कोटी ५ लाख रुपयांचा, तर चरखा ऑईल मिलमधून ७८ लाख २२ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच वडवणी येथील जय हनुमान ट्रेडर्स येथून ७ लाख २४ हजार रुपयांचे, तर माजलगावच्या जुना मोंढा परिसरातील मे. जान्हवी कमर्शियल्स येथून २ लाख ७९ हजार रुपयांचे सुट्टे खाद्यतेल जप्त करण्यात आले. माजलगाव येथे बंदी असलेले सुट्टे सोयाबीन तेल अत्यंत असुरक्षित पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी घोपे, मुळे, गाढे, खंदारे, दत्तू आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित चारही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून दुकाने सील करण्यात आली आहेत. विविध नामांकित ब्रँडच्या खाद्यतेलांचे २६ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानुसार संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोरांमध्ये एकच खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.









