6 जानेवारीला नगरसेवक संतोष सुरवसेने भांडणे मिटवण्यासाठी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाला बोलवले होते घरी
निवडणुकीत विरोधात काम करतो म्हणून दोघांना झाली होती बेदम मारहाण, त्यात एकाच मृत्यू
पाच आरोपी अटकेत, मुख्य आरोपी अद्याप फरार, आरोपी नगरसेवक संतोष सुरवसेला जेरबंद करण्याची मागणी
आष्टी (रिपोर्टर) आष्टी येथील नगरसेवक संतोष सुरवसे यांच्यासह दहा ते वीस जणांनी येथील सुरवसे कुटुंबियांना घरी बोलावून घराचे गेट बंद करून बेदम मारहाण केल्याची घटना 6 जानेवारीला घडली होती. या मारहाणीत जखमी असलेले तात्या बबन सुरवसे यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी नगरसेवक संतोष सुरवसेसह अन्यवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल झालेला होता. आता खुनाचा गुन्हा दाखल होणार. सदरची घटना ही निवडणुकीमध्ये विरोधात काम केले म्हणून नगरसेवकाने सुरवसे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादीसह मयत हे मारहाण केल्याच्या घटनेनंतर 6 जानेवारीला आष्टी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता नगरसेवक संतोष सुरवसे यांनी केस करू नका, परत घरी चला, घरी बसून भांडण मिटवू, असे म्हणत पोलीस ठाण्यातून बाहेर आणले. त्यानंतर फिर्यादी व मयत नगरसेवक संतोष सुरवसे यांच्या घरी गेले. या वेळी त्याठिकाणी संतोष सुरवसे, अक्षय ऊर्फ लक्ष्मण मुरकुटे, रणजीत ऊर्फ छोट्या गुंजाळ, सागर चांगुले, सौरभ संतोष जाधव, आदित्य गोविंद मुरकुटे, प्रकाश रामा मुरकुटे, रविल छगन विटकर, रवी धोतरे व इतर सात ते आठ जण तेथे हजर होते. मयत व फिर्यादी घरात गेल्यानंतर अक्षय मुरकुटे याने घराचे गेट लावून घेतले व बाजुला ठेवलेले लोखंडी रॉड, तलवार, लाकडी दांडे घेेऊन अंगावर धावून आले. या वेळी नगरसेवक संतोष यांनी या लोकांनी निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध काम केले, आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहेत, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अमित या वेळी भांडण मिटवण्यासाठी आलो आहोत, अशी वागणूक का देता? असे विचारताच संतोष सुरवसेसह इतरांनी हातातील हत्याराने, लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादी नाना बबन सुरवसे, त्यांचा भाऊ तात्या बबन सुरवसे यासह अमोल मुरकुटे हे जखमी झाले. मारहाण करून संतोष सुरवसे व इतर तेथून निघून गेले. त्यानंतर जखमींना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी पुढील उपचारासाठी नगर येथे रेफर करण्यात आले असता आज सकाळी यातील जखमी तात्या बबन सुरवसे यांचा मृत्यू झाला. य प्रकरणी आष्टी पोलिसात आधीच कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली आहे मात्र मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे हा फरार आहे. सदरच्या खुनाच्या घटनेने आष्टीत खळबळ उडाली असून आरोपीच्या अटकेची मागणी मयताच्या कुटुंबियाकडून केली जात आहे.