पोलीस घटनास्थळावर, आरोपीचा माग घेण्यासाठी पोलीस हरकतमध्ये
पिडित गेल्या होत्या शेळ्या चारण्यासाठी
पहिल्या दिवशी तिघांपैकी दोघांनी दोघींवर केला बलात्कार
दुसर्या दिवशी तिसर्याने केला एकीवर बलात्कार
पिडितांना कायम संबंध ठेवण्यासाठी धमकावलेही
माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव शहरापासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या एका गावात गेल्या दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडल्याचे आज उघडकीस आले. शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या 15 ते 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर तीन तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पिडितांच्या तक्रारीनंतर समोर आली असून या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात तीन नराधमांविरोधात बलात्काराचा पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनाम्याबरोबर बलात्कार करणार्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत यातील आरोपींना ताब्यात घेतले नसले तरी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी माजलगाव पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत.
माजलगाव शहरापासून 20 कि.मी. अंतरावर एक खेडेगाव आहे. त्या गावातल्या 15 ते 17 वर्षीय दोन मुली रोजच्या प्रमाणे गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेल्या. 10 जून रोजी त्या शेळ्या चारत असताना अचानक मोटारसायकलवरून तीन तरुण त्या शेतामध्ये गेले. त्याठिकाणी दोन तरुणांनी आधी त्या दोन अल्पवयीन मुलींसोबत बळजबरीने अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर ते तिघे परत गावाकडे निघून गेले. मात्र दुसर्या दिवशी पुन्हा त्या दोन तरुणींपैकी एका तरुणीला धमकावत त्या तिघांमधील एका तरुणाने बळजबरीने बलात्कार केला. सदरच्या घटनेने दोन्ही मुली भयभीत झाल्या होत्या. तीन मुले सातत्याने असेच आपल्याला त्रास देती, अत्याचार करतील हे लक्षात आल्यानंतर त्यातील एका मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रसंग आपल्या आज्जीला सांगितला. आज्जीने हा प्रकरा घरातील कर्त्या पुरुषांना आणि महिलांना सांगितल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी आज सकाळी पिडित मुलींना सोबत घेऊन माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना पिडित मुलींनी घडलेली हकीकत इत्यंभूत सांगितल्यानंतर पोलीसही हादरून गेले. त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य पाहून मुलींना सोबत घेत घटनास्थळ गाठले. प्रथमदर्शी पोलिसांना सदरची घटना ही घडली असावी, असा अंदाज आल्यानंतर ही घटना अधिक गांभीर्याने घेऊन यातील मुलीच्या फिर्यादीवरून तीन बलात्कार्यांविरोधात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. दुपारी एकच्या सुमारास माजलगाव ग्रामीण पोलीस संबंधित मुलींना सोबत घेऊन घटनास्थळावर होते. यातील तीन नराधमांना शोधण्यासाठी पोलीस प्रयत्नांची परिकाष्ठा करत असून सदरच्या घटनेमुळे सदरील गावासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.