लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी असला तरी, प्रमुख पक्षाची तयारी जोरात सुरु आहे. भाजपाच्या सत्तेच्या कार्यकाळाला दोन टर्म पुर्ण होत आहे. नऊ वर्षात मोदी यांनी देशाला काय दिलं तर महागाई, बेरोजगारी, आणि अंतर्गत वादावादी हे कुणीही सांगू शकेल? लोकांना भ्रमीत करणं आणि दिशाभूल करणं हेच आज पर्यंतचं भाजपाचा धोरणं राहिलं. येत्या निवडणुकीत भाजपावाले आणखी वेगवेगळे मुद्दे उकरुन काढून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणार? भाजपाला तोडीस तोड देण्यासाठी विरोधकांनी वज्रमुठ आवळली. कधी नव्हे ते पंधरा पक्षाचे विरोधक एकत्रीत आले. ऐरवी मतभेद असणारे काही पक्षाचे नेते भाजपाच्या विरोधात निवडणुकीत उतरण्यासाठी एक झाले. जागा वाटपाचा तिढा अजुन सुटला नाही. पुढील बैठकीत जागा वाटपाचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. काँग्रेस मोठा पक्ष असला तरी काँग्रेसची देशात तितकी ताकद नाही. त्यामुळे कॉग्रेंस पक्षाला इतर पक्षासोबत जाणं गरजेचंच आहे. पंधरा पक्षांनी एकत्रीत येणं तेही बडया प्रादेशीक पक्षांचा सहभाग असणं म्हणजे ही ताकद कमी नाही, हे पंधरा पक्ष भाजपाला जेरीस आणू शकतात? भाजपा विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटण्यात झाली. जो बिहार जयप्रकाश नारायण यांच्या नावामुळे परिचीत आहे. त्याच भुमीतून विरोधकांनी ऐक्याची हाक दिली.
काँग्रसेच नमतं !
काँग्रेसला आपलं अस्तित्व टिकायचं असेल व पुढे जायचं असेल तर काँग्रेस पक्षाला आपला तोरा कमी करावा लागणार आहे. काँग्रेसचे काही नेते ताकद नसतांना उगीच दंडाच्या बेडकुळ्या दाखवत असतात. ताठर पणामुळेच काँग्रेसची ही अवस्था झाली. कर्नाटक राज्यात काँग्रेसचा विजय झाला. यात काँग्रेसने हुरळून जाता कामा नये. येणार्या निवडणुकीची काँग्रेसने बांधणी केली पाहिजे. राहूल गांधी पक्षात चांगले सक्रीय झाले. भारत जोडो यात्रेने काँग्रेसला बराच फायदा झाला. यात्रेपासून काँग्रेसमध्ये जिवंतपणा आला. कॉग्रेंसमधील नेत्यांचा उत्साह वाढला. नाही तर काँग्रेस अगदी मरणअवस्थेत होती. काँग्रेसने पक्षसंघटनेत बदल केला. पहिल्यांदा गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर नेत्याची पक्षाध्यक्षपदी निवड केली. खरगे हे अध्यक्ष झाले. काँग्रेस आणि काही पक्षाचं नेहमीच जमलं नाही. त्यात आप, तृणमुल काँग्रेस आहे, तरी पण कॉग्रेंसने याबाबत अजुन काही तक्रार केली नाही. अनेक राज्यात काँग्रेस आणि आपचे खटके उडालेले आहेत. गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीत आपने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे काँग्रेसचं बरचं नुकसान झालं. असं असतांना काँग्रेसने आपच्या बाबतीत कुठलीही कुरकुर केली नाही हे काँग्रेसचं शहाणपण म्हणावं लागेल. डाव्या पक्षांशीही तितकं कॉग्रेंसचं जमलेलं नाही पण डाव्या पक्षांना सोबत घेण्याबाबत काँग्रेसची तक्रार नसावी, बैठकीला राहूूल गांधी आणि अध्यक्ष खरगे या दोघांची उपस्थिती होती. काँग्रेसला इतर समविचारी पक्षांचा हात आपल्या हातात घेवूनच पुढे चालवे लागणार आहे, नाही तर काँग्रेसची अवस्था आणखी वाईट होईल? येणारी निवडणुक जिंकण्यासाठी काँग्रेस चांगलीच सज्ज झाली आहे. त्यात काँग्रेस किती यशस्वी होईल हे आगामी काळच सांगेल. यात राहूल गांधी यांची परिक्षा आहे.
नितीशकुमार यांचा पुढाकार
नितीशकुमार हे नेहमीच इकडून, तिकडे फिरणारे नेते म्हणुन परिचीत आहे. मवाळवादी चेहरा म्हणुन नितीशकुमार देशात ओळखले जातात. नितीश यांनी भाजपासोबत जावून बिहार राज्यात सत्ता स्थापन केली. मध्यंतरी त्यांनी भाजपाची साथ सोडली लालू प्रसाद यांच्या पक्षाशी जुळवून घेवून आपली सत्ता कायम ठेवली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नितीश यांचे नाव इतर पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी चर्चीले जात होते. मात्र नितीश यांनी कुठलाही पुढाकार घेतला नाही. आता मात्र त्यांनी चांगला पुढाकार घेतला. भाजपा विरोधकांची मोट बांधण्यासाठी नितीश हेच पुढे आहेत. बिहारमध्ये बैठक ठेवण्याचं त्याचंच नियोजन आहे. कारण बिहारमधून आज पर्यंत अनेक चळवळी झाल्या आहेत. मग त्या राजकीय असो किंवा सामाजीक असो. याचाच संदर्भात देवून नितीशकुमार यांनी पाटण्यात पंधरा पक्षाच्या नेत्यांना एकाच छत्राखाली आणुन चर्चा घडवून आणली. या बैठकीची देशाच्या राजकारणात चर्चा होवू लागली.
#महाराष्ट्राची भुमिका महत्वाची
महाराष्ट्र राज्यात सध्या भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आहे. शिवसेना फोडून शिंदे यांनी भाजपाशी घरोबा केला. हा प्रकार राज्यातील जनतेला मुळीच आवडला नाही. जनतेच्या जे मनात होतं तेच आम्ही केलं असं शिंदे किती ही म्हणत असले तरी शिंदे व त्यांच्या समर्थकांची बंडखोरी ही काही समर्थनिय बाब नाही. या दोन्ही पक्षाला टक्कर देण्याचं काम महाआघाडी करत आहे. ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांची आघाडी आहे. ही आघाडी तुटेल असं वाटत नाही आणि तुटली तर यात मोठं नुकसान ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचं होवू शकतं. त्यामुळे काँग्रेस व ठाकरे राष्ट्रवादी सोबतच राहतील या बाबत शंका नाही. जागा वाटपाचा तिडा तिन्ही पक्षाला सोडवावा लागणार आहे. काँग्रसेची ताकद किती आहे व गत वेळी किती जागा निवडून आल्या होत्या त्यानूसार काँग्रेसला जागा मिळू शकतात, कारण काँग्रेसचे काही नेते जास्त जागा मागतात. तिन्ही पक्षाची लोकसभेची ताकद भाजपपेक्षा कमीच होती. भाजपा सोबत होती म्हणुन शिवसेना (ठाकरे गटाच्या) गत वेळी अठरा जागा निवडून आल्या होत्या. काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली. राष्ट्रवादीने कशा,बशा चार जागा जिंकल्या. आता हे तिन्ही पक्ष एकत्रीत लढले तर नक्कीच त्यांच्या चांगल्या जागा निवडून येवू शकतात? राज्यात भाजपासमोर तिन्ही पक्षाचं मोठं आव्हान राहणार आहे.
#मतविभागणी टाळली तर?
निवडणुकीत मताचा आकडा महत्वाचा असतो, काही उमेदवार लाखाच्या लिडने जिंकतात तर काही अगदी कमी मतांनी विजयी होत असतात. लोकसभा मतदार संघ मोठे असतात. त्यामुळे मतदारांची संख्या देखील मोठीच असते. मतविभागणी टाळता आली तरच प्रमुख आणि चर्चेतील उमेदवारासाठी चांगले वातावरण निर्माण होत असतं. दहा, वीस हजार मते घेणारे उमेदवार निवडणुकीत उतरले तर त्याचा चांगला फटका मुख्य उमेदवारांना बसत असतो. सध्या आम आदमी ही पार्टी चांगली जोरात आहे. दिल्ली नंतर पंजाब हे राज्य आम आदमीकडे आहे. येत्या लोकसभेत आम आदमी पार्टी आघाडी सोबत येत आहे, ही आघाडीसाठी चांगलीच बाब म्हणावी लागेल. आपमुळे काँग्रेसचं बरचं नुकसान झालेलं आहे. डाव्या पक्षाची पुर्वी सारखी ताकद नाही पण काही मतदार संघात या पक्षाचे मतदान निर्णायक आहे. त्यामुळे डाव्यांचा फायदा आघाडीला मिळू शकतो. अन्य काही छोटे पक्ष ही आघाडीसोबत आहे हे आघाडीसाठी चांगली गोष्ट आहे. एमआयएम अजुन स्वतंत्र आहे. या पक्षाने आपली भुमिका घेतली नाही. एमआयएम ने आज पर्यंत समविचारी पक्षांचे चांगलेच नुकसान केले. पाटण्यात एमआयएमला आमंत्रणच नव्हतं. या पक्षाला आघाडीत घेण्याची इच्छा इतर पक्षांची नसावी, म्हणुन हा पक्ष टाळण्यात आला आसावा? भाजपाचा फायदा करणारा पक्ष म्हणुन एमआयएमकडे पाहितलं जातं. पुर्वी सारखी तीव्रता या पक्षाची राहिली नाही. त्यामुळे आता एमआयएमच्या उमेदारांना पुर्वीसारखी मते पडत नाहीत. एमआयएम सारखाच प्रयोग चंद्रशेखर राव यांनी सुरु केला. बीआरएस हा पक्ष आघाडीचंच नुकसान करणारा आहे. राव महाराष्ट्रात किती मते खातात हे आगामी काळात दिसून येईल. राव यांना महाराष्ट्रात आणण्याचं षडयंत्रच आहे. राव यांच्यामुळे आघाडीची बरीच डोकेदुखी वाढू शकते?
#राज्य सांभाळणारे नेते
पाटण्यातील बैठकीला खरगे, राहुल गांधी, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, शरद पवार, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, सीताराम येचुरी, डी. राजा, अखिलेश यादव, ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि दीपंकर भट्टाचार्य उपस्थित होते. यामध्ये बरीच मंडळी ही बडी आहे. बिहार सांभाळण्याची ताकद लालू यादव, नितीश या दोघात आहे, हे दोघे एकत्रीत असल्यामुळे भाजपाला बिहारमध्ये तितकी संधी मिळणार नाही. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यांची चांगली ताकद आहे. आघाडीत मायावती असत्या तर आणखी फरक पडला असता, बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. तामिळनाडूतील स्टॅलिन ताकदवान नेते आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता यांची चलती आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर भाजपावाला हारवले आहे. उध्दव ठाकरे हे आघाडीत सहभागी आहे. ठाकरे यांना आघाडीशिवाय पर्याय नाही. आघाडीत जितके नेते सहभागी झाले आहेत. त्यांचे राजकीय वलय आणि त्यांची राजकीय कारर्कीद चांगली राहिलेली आहे. भाजपावाले आघाडी बद्दल काही म्हणत असले तरी ही आघाडी तितकी कच्ची राहणार नाही. या नवीन आघाडीमुळे भाजपाच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही लोकसभा निवडणुकीची आणि आजच्या राजकारणाची अवस्था बदलेली आहे. लोकांत अनेक कारणावरुन संताप आहे. प्रत्येक दहा वर्षांनी राजकीय परस्थिती बदलत असते हे आज पर्यंतच्या इतिहासातून दिसून आलेलं आहे. देशातील मोठ, मोठे सत्तास्थाने उलथून पडलेले आहे. आघाडीतील नेते जितके मोठे आहेत. तितकेच ते राजकीय दृष्टया आक्रमक सुध्दा आहेत. त्यामुळे आता खर्या अर्थाने 2024 च्या निवडणुकीची रंगत पाहण्यासारखी राहणार आहे. दोन्ही वेळच्या लोकसभा निवडणुका एकतर्फी झाल्यासारख्या होत्या. आता येणारी निवडणूक टफच होईल.