Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- 137 वर्षाची काँग्रेस अध्यक्षाविना!! काँग्रेस काल आणि आज

प्रखर- 137 वर्षाची काँग्रेस अध्यक्षाविना!! काँग्रेस काल आणि आज


स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भुमिका बजावणारा काँग्रेस पक्ष आज अध्यक्षाविना आहे. काँग्रेस पक्ष स्थापन होवून 137 वर्ष झाली. काँग्रेस पक्ष हा इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यासाठी स्थापन झालेला होता. देशातील जनतेला एकत्रीत आणण्यासाठी एक संघटन हवं म्हणुन काँग्रेस पक्षाची निर्मीती झाली. काँग्रेसच्या निर्मीतीचा कर्ताधर्ता ब्रिटनचाच एक माजी अधिकारी आहे. ब्रिटीश संसदेच्या विरोधी पक्षाचा मुलगा अ‍ॅक्टो अ‍ॅलन ह्ययुमन हा भारतात सनदी अधिकारी होता. तो बंगालची राजधानी कोलकत्ता येथे कार्यरत होता. 1882 साली अ‍ॅलन हा अधिकारी सेवेतून निवृत्त झाला, तो एक सामाजिक सेवेच्या हेतूचा होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर इंग्लंडला जाण्याऐवजी त्याने भारतात राहणे पसंद केले. एकदा त्यांनी अरविंद घोषच्या एका राष्ट्रीय विचाराच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना उद्देशून ह्ययुमन याने म्हटले की, ‘अरे काय तुम्ही हिंदुस्थानी तरुण आहात, तुमच्यावर ब्रिटीश शासन करत आहे, तुम्ही आपल्या देशाकरीता त्यांच्या शासनाच्या पाशातून मुक्त होण्याची थोडी ही भावना ठेवीत नाहीत. ही एका दुर्बल राष्ट्राची वृत्ती तुम्ही झुगारुन लावा’, ही गोष्ट विद्यार्थ्यांना पटली अन, त्यातून परिवर्तनाला सुरुवात झाली. अ‍ॅलन यांचे हे वक्तव्य विद्यार्थ्यांनी कलकत्याच्या काही राजकीय पुढार्‍यांना सांगितले. अ‍ॅलन यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणुन घेण्याचं काम काही नेत्यांनी केलं. सुरेद्रनाथसह काही नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अ‍ॅलन यांनी सांगितले की, तुम्ही एखादं संघटन का तयार करत नाही? सुरेद्रनाथ बॅनर्जी म्हणाले की, ‘इंडीयन नॅशनल कौसिल’ ही संस्था स्थापन केली आहे. अ‍ॅलन म्हणाले, की ही संघटना फक्त राज्यापुरती मर्यादीत आहे. देश पातळीवरचं संघटन असायला हवं. त्यानूसार 28 डिसेंबर 1885 साली मुबंईत 172 प्रतिनिधीच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैंठकीला उमेशचंद्र बॅनर्जी, सुरेद्रनाथ बॅनर्जी, रानडे, दादाभाई नौरोजी, सह आदी उपस्थित होते. सर्वाच्या सहमतीने ‘इंडीयन नॅशनल काँग्रेस’ ही संस्था स्थापन करण्यात आली. त्याचे प्रथम अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे निवडण्यात आले. जनरल सेक्रेटरी म्हणुन अ‍ॅलन यांची निवड करण्यात आली. तेव्हा पासून काँग्रेसचा प्रवास सुरु झाला.


नेहरु 16वर्ष पंतप्रधान होते

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची महत्वाची भुमिका होती. स्वातंत्र्य नंतर काँग्रेस पक्ष कार्यान्वित राहिला. काँग्रेसचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु झाले. नेहरु यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेला होता, ते एक लढवय्ये आणि गांधी विचाराने भारलेले नेते होते. 1964 पर्यंत ते पंतप्रधान होते. सोळा वर्ष नेहरुंनी देशाचा कारभार हाकला. नेहरुंच्या कार्यकाळात देशात उद्योग क्षेत्रात मोठी वाढ झाली. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास करणं हे पहिल्या मंत्रीमंडळा समोर मोठे आव्हान होेते. उद्योग क्षेत्र वाढवण्याचं काम जोमाने नेहरु यांनी केलं. उद्योगामुळे देशाची प्रगती होत गेली. विशेष करुन नेहरुंनी समाजवादाची भुमिका रुजवली. लोकशाही परिपक्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशात विविध जाती, धर्माचे लोक असतांना सगळ्यांना सोबत घेवून त्यांनी देशाच्या विकासाच्या मोलाची भुमिका बजावली. स्वातंत्र्यपुर्व काळात भारतात विविध सामाजिक समस्या होत्या. त्यांची सोडवणुक करणे आवश्यक होते. साम्राज्यवाद, धर्मसंघर्ष, जातीवर आधारीत भांडणे, जुलूमशाही यामुळे जनता त्रस्त झाली होती. या सर्व समस्यांवरील पर्याय म्हणजे लोकशाही आहे याची जाणीव नेहरुंना झाली होती. नेहरु हे काँग्रेस पक्षाचं मोठं व्यक्तीमत्व होते. राजकारण कसं असावं याचा चांगला पाठ नेहरुंनी घालून दिलेला आहे.


इंदिरा गांधीचं कर्तृत्व
काँग्रेस पक्षात नेहरु नंतर मोठ्या नेत्या म्हणुन इंदिरा गांधी यांचा उदय झाला. पंतप्रधान पदावर असतांनाच लालबहादुर शास्त्री यांचे 1966 साली निधन झाले. लालबहाद्दूर यांच्या नंतर पंतप्रधान कोण असा प्रश्‍न पडला होता? पंतप्रधान पदासाठी मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण या तीन नेत्यांचे नाव पुढे येत होते. यात देसाई सर्वात पुढे होते. मात्र सर्वांवर मात करुन इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झाल्या. पक्षातील खासदारांची संख्या इंदिरा गांधी यांच्या पाठीमागे जास्त होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पक्षात दोन गट पडले. पक्षातील वाद इतका विकोपाला गेला की, पक्षाने इंदिरा गांधी यांना पक्षातून काढून टाकले होते. पंतप्रधानाला पक्षातून काढून टाकण्याची घटना देशात प्रथमच घडली होती. ही कारवाई 1969 च्या राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीवरुन झाली होती. संजीव रेड्डी हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार काँग्रेसचे होते, तर इंदिरा यांनी गिरी यांना उमेदवारी दिली होती. पक्षाशी बंडखोरी केली म्हणुन त्यावेळच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी इंदिरा गांधी यांच्यावर कारवाई केली होती. पुढे इंदिरा गांधी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. देशातील अस्थितेमुळे इंदिरा यांनी आणीबाणी जाहीर केली होती, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचा 1977 साली रायबरेलीतून पराभव झाला होता. त्यांच्या पक्षाला देशातील जनतेने नाकारले होते, पुन्हा इंदिरा गांधी यांनी आपलं वर्चस्व निर्माण करुन विजयी पताका फडकावली. देशहितासाठी ठोस भुमिका घेतल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. 31 ऑक्टोबर 1984 साली त्यांची हत्या झाली. या घटनेने देशच नव्हे जग हारदले होते. इंदिरा गांधी यांची हत्या म्हणजे, महावटवृक्षचं उलमळून पडला होता. त्यांच्या सारखं नेतृत्व नंतर ना पक्षात निर्माण झालं ना, इतर पक्षात.


राजीव गांधी यांचं नेतृत्व
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. राजीव हे अगदी कमी वयात पंतप्रधान झाले होते. राजीव यांच्या कार्यकाळात देशात नवीन तंत्रज्ञान आलं होतं, ते राजीव गांधी यांनीच आणलं होतं. नव्या तंत्रज्ञानामुळे राजीव गांधी यांना विरोधाचा सामाना करावा लागला होता. आज जे काही नवीन तंत्रज्ञान विकास झाले आहे. त्याचे निर्मातेच राजीव गांधी आहेत. कॉप्म्युटर्स, दुरसंचार हे राजीव गांधी यांनीच आणलेले आहे. नेहरु, इंदिरा नंतर काँग्रसेचं मोठं नेतृत्व म्हणुन राजीव गांधी यांच्याकडे पाहितले जात होते. दुर्देवाने राजीव गांधी यांची 21 मे 1991 साली हत्या झाली. प्रचार सभेला गेल्यानंतर ही घटना घडली होती. राजीव गांधी यांच्या नंतर कोण असा प्रश्‍न त्यावेळच्या काँग्रेसपुढे होता, राजीव यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालेलं होतं. काँग्रेसला 244 जागा मिळाल्या. नरसिंगराव हे पंतप्रधान झाले. राव पाच वर्ष पंतप्रधान होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाला घरघर लागत गेली. पुढे आघाडयाचं सरकार आलं. व्ही.पी, सिंग, भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी हे नेते देशाचे पंतप्रधान झाले. 1995 नंतर बिगर काँग्रेसचं सरकार स्थापन होण्यास सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाला कोण सावरणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता. गांधी कुटूंबा व्यतिरिक्त इतरांना पक्ष सावरता येईल का? हा मुद्दा समोर येत होता. गांधी कुटूंबातील कुणीच पक्षात सक्रीय नव्हतं. मात्र काँग्रसेच्या काही ज्येष्ठांनी सोनिया गांधी यांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. सोनिया गांधी राजकारणात येताच, काँग्रेसमध्ये गटबाजीला सुरवात झाली. काहींनी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून ठरला. 14 मार्च 1998 साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. सोनिया यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्याने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.


काँग्रेसची मुसंडी अन….अपटी
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा विकास होणार नाही, असं काहीचं मत होतं. सोनिया गांधी यांच्या ताब्यात पक्ष असल्यामुळे आपलं काही पक्षात चालणार नाही, म्हणुन काहींनी पक्ष सोडला. 1999 साली राज्यातील बडे नेते शरद पवार, पी.ए. संगमा, तारीक अन्वर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 2004 साली भाजपाला देशातील जनतेने नाकारलं. काँग्रेस आघाडीला 217 जागा मिळाल्या. डाव्या आघाडीला 136 तर भाजपाच्या आघाडीला 186 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आघाडीने सत्तेचा दावा केला. काँग्रेसकडून सोनिया गांधीच पंतप्रधान होणार असं समोर आलं होतं, पण विदेशीपणाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित करुन सोनिया यांना पंतप्रधान होण्यास विरोध केला. वाढता विरोध पाहता, सोनिया गांधी यांनी स्वत: पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेत, मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी बसवलं. सिंग हे अर्थतज्ञ होते. नरसिंग राव यांच्या मंत्रीमंडळात ते अर्थमंत्री होते. सिंग हे दहा वर्ष पंतप्रधान होते. दहा वर्ष काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून देण्यास सोनिया यांचा सहभाग होता. काँग्रेस आघाडीच्या दुसर्‍या टर्ममध्ये भ्रष्टाचाराचे मुद्दे प्रचंड प्रमाणात गाजले. भ्रष्ट कारभाराची देशात चर्चा झाली. 2012 साली समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत उपोषणाला बसले होते. हजारे यांच्या आंदोलनामुळे एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. भाजपाने नरेंद्र मोदी यांना 2013 साली पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन घोषीत केलं. देशात बदल घडवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजपाला साथ द्या अशी साद मोदी यांनी घातली होती, मोदी यांचा जादू चालला आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुर्णंता उखडून पडला. कधी नव्हे काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या. 2019 च्या निवडणुकीत काही तरी चमत्कार घडेल असं वाटत होतं. राहूल गांधी यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद होतं, पण या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवला सामोरे जावे लागले. 52 जागाच मिळाल्या. काँग्रेस दुसर्‍यांदा विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्या इतक्या जागा मिळवू शकली नाही. निवडणुकीतील पराभवामुळे राहूल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या प्रभारी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. पक्षात ज्येष्ठांना मान नाही, पक्षात नेमकं काय चाललं कळेना असं म्हणुन काही ज्येष्ठांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामुळे काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली होती. पक्षाची बाजू पडती असल्याने देशातील अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देवून भाजपासह इतर पक्षात जाणं पसंद केलं. तीन राज्यातच काँगे्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत आहे. राहूल गांधी नंतर प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय दिसू लागल्या. उत्तरप्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्याने त्या राज्यात प्रियंका गांधी यांचे दौरे वाढले. त्यांच्या दौर्‍याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. काँग्रेस हा एक बलाढय पक्ष म्हणुन उभा होता. आज या पक्षाची वाईट अवस्था झाली. पक्षात झोकून काम करणारे कार्यकर्ते राहिले नाहीत. नेते आपल्याच तोर्‍यात असतात. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला 20 टक्के मते पडलेले आहेत, हे वीस टक्के मते कमी नाहीत. सत्तेला बहुमताची गरज असते. भाजपा 35 टक्यात आहे. त्यामुळे तो सत्तेत आहे. काँग्रेसच्या भवितव्या बाबत त्यांच्याच पक्षाचे नेते चिंता व्यक्त करत असतात, मात्र पक्ष वाढीसाठी विशेष काही करत नाहीत. पक्ष वाढवण्यासाठी पुन्हा तळागळापासून काम करावे लागणार आहे. काँग्रेसला खुप मोठा इतिहास आहे. इतिहासातून प्रेरणा घेत वर्तमानावर मात करत भविष्यकाळ घडवता येत असतो. एवढा मोठा पक्ष आणि मोठा वारसा असणार्‍या काँग्रेसला आज अध्यक्ष नाही, ही बाब पक्षासाठी नक्कीच चिंता व्यक्त करायला लावणारी आहे. काँग्रेस काल काय होती, आणि आज काय झाली.!!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!