Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडशिवसेनेने अनिल जगतापांना दिली डरकाळी फोडण्याची संधी, सेनेच्या मुखपत्रातून बीडच्या जिल्हाप्रमुखपदाची घोषणा

शिवसेनेने अनिल जगतापांना दिली डरकाळी फोडण्याची संधी, सेनेच्या मुखपत्रातून बीडच्या जिल्हाप्रमुखपदाची घोषणा

बीड, आष्टी, गेवराई, पाटोद्याची जगतापांवर जबाबदारी
बीड (रिपोर्टर)- गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या बीडच्या जिल्हा शिवसेना प्रमुखपदी तत्कालीन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून या निवडीची घोषणा शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी अनिल जगताप यांच्यावर असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने ही जबाबदारी अनिल जगताप यांच्याकडे सोपविली आहे. निवडीच्या घोषणेनंतर जगताप समर्थक शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
   तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या विरोधात गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी कुंडलिक खांडे यांच्याकडील जिल्हाप्रमुख पदावर स्थगिती आणली. गेल्या महिन्यांपासून बीड जिल्हा शिवसेनाप्रमुखपद हे रिक्त होतं. या पदावर वर्णी लागावी म्हणून अनेकांनी मातोश्रीचे खेटे घातले. मुक्काम ठोकले मात्र पक्षश्रेष्ठीने गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त ठेवले. अखेर आज शिवसेनेच्या मुखपत्रातून बीड जिल्हा शिवसेनाप्रमुखाची घोषणा करण्यात आली. तेरा वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद सांभाळणारे कळवट शिवसैनिक अनिल जगताप यांच्या नावाची घोषणा मुखपत्रातून आज करण्यात आली. अनिल जगताप यांच्याकडे बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून शिवसेनेने सध्या तरी अनिल जगताप यांच्याकडे प्रभारी म्हणून जिल्हाप्रमुखाचा पदभार दिला आहे. येत्या सहा महिन्यांच्या कालखंडात जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

अनिल जगताप यांचा होणार भव्य सत्कार -बाळासाहेब पिंगळे
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्कनेते चंद्रकांत खैरे व संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून अनिल जगताप यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांच्या निवडीबद्दल भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले असून 16 मार्च, बुधवार सकाळी 12 वाजता पिंगळे पंच मंडळ सभागृह, पिंगळे गल्ली बीड येथे हा सत्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यास शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हाप्रमुक बाळासाहेब पिंगळे यांनी प्रसिद्धीस दिेल्या पत्रकातून केले आहे.  

Most Popular

error: Content is protected !!