Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख -या येड्या घबाळ्यांचे धनी कोण?

अग्रलेख -या येड्या घबाळ्यांचे धनी कोण?

अग्रलेख -या येड्या घबाळ्यांचे
धनी कोण?
जयजवान जय किसानचा नारा देणार्‍या या भारत देशात आज जगाचा पोशिंदा असलेला किसान रस्त्यावर येऊन पडला आहे. अठरा विश्‍व दारिद्रयात असलेला हा शेतकरी रोज मरणाच्या दारात जात आहे. कधी निसर्ग कोपतो तर कधी मायबाप शासन आपल्या निर्णयातून कापते, अशा स्थितीत आपलं आयुष्य जगणारा शेतकरी रोजच्या मरणयातना सहन करत जगाला पोसण्याचे काम करतच राहतो. मात्र जो व्यथित होतो, संघर्ष करण्याची हिम्मत ज्याची संपते तो मात्र सरणावर जातो हे उघड सत्य समोर असताना शासन व्यवस्था मात्र शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा शेतकर्‍यांना अधिक अधिक कसे पिचले जाईले याची व्यवस्था करून ठेवत असल्याचे मोदी सरकारने केलेल्या शेती कायद्यावरून दिसून येते. एकीकडे शेतकरी विरोधात कायदे करायचे, ते शेतकर्‍यांवर लादायचे, या कायद्याविरोधात आवाज उठवला गेला तर आवाज उठवणार्‍यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांना बदनाम करायचे, कधी मधी अतिरेकी म्हणायचे, कधी खलिस्तानवादी म्हणायचे तर कधी या आंदोलनाला बाहेर देशातल्या लोकांचा हात असल्याचे सांगायचे आणि हे सांगणारे त्याच केंद्र सरकारमधील भाजपाचे आमदार-खासदार मंत्री असतील तर अशा या येड्या-घबाळ्यांचे धनी कोण? हा प्रश्‍न या ठिकाणी विचारावाच लागेल, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेती कायदा केला, हा कायदा सरळसरळ


शेतकर्‍यांना
उद्ध्वस्त करणारा

कायदा आहे. ३ विषयात केलेला हा कायदा सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी अक्षरश: विषच आहे. नव्या कायद्यातला पहिला मुद्दा हा अन्नधान्याच्या साठेबाजीवरील बंदी हटवण्याचा आहे. दुसरा मुद्दा हा प्रायव्हेट कंपनी आणि शेतकर्‍यात कराराचा आहे तर तिसरा मुद्दा हा सरकारी भाजी मंडईच्या समोर प्रायव्हेट कंपनीची मंडी असणारा आहे. या तिन्ही मुद्यांकडे बारकाईने पाहितले तर यात सर्वसामान्य शेतकर्‍यांचे उदात्तीकरण अथवा उज्वलीत भविष्य घडणार, असं कुठंही दिसत नाही. आजपर्यंत या देशात अन्नधान्याच्या साठेबाजीवर बंदी होती, मात्र ती आता उठवण्यात आल्याने दोन पोत्यांपासून २५ पोते उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना साठेबाजी तर करता येणार नाही परंतु मोठमोठ्या कंपन्यांना, उद्योगपतींना आणि व्यापार्‍यांना सर्वसामान्य शेतकर्‍यांचं धान्य कमी कितीत खरेदी करून ते अधिकृतपणे साठेबाजी करता येईल आणि धान्याचा कृत्रिम तुटवडा करत ते धान्य ज्यादा भावाने विकले जाईल.

इथे सर्वसामान्य शेतकर्‍यांचा फायदा तो काय, हा सवाल उपस्थित होतोच, कंत्राट शेतीच्या बाबतीतही तेच होणार आहे. एखादी कंपनी शेतकर्‍यासोबत दोन-पाच वर्षांचा करार करेल, परंतु जेव्हा बाजारात एखाद्या शेती मालाचे भाव वाढतील तेव्हा शेतकर्‍याला करार झालेल्या किमतीतच माल द्यावा लागेल आणि करार जास्त किमतीचा असेल आणि बाजारात त्या मालाचा भाव कमी असेल तर कंपनी त्या शेतकर्‍याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करेल तेव्हा शेतकर्‍याला जिल्हाधिकार्‍यांपर्यंत खेटे घालावे लागतील. तोपर्यंत शेतातला माल सडून जाईल अथवा खराब होईल. तिसरा मुद्दा जो बाजार समितींच्या समोर प्रायव्हेट कंपनीच्या मंडईचा येतो तेव्हा हळूहळू बाजार समित्या बंद केल्या जातील आणि प्रायव्हेट कंपन्या शेतकर्‍यांना ठिकठिकाणी पिळवणूक करतील. म्हणजे हा कायदा सरळसरळ मोठमोठ्या कंपन्यांना फायदा करणारा आहे. हे उघड असताना शेतकरी जेव्हा न्याय हक्कासाठी आपला


आवाज
बुलंद

करतो आणि गेल्या पंधरा दिवसांपासून दिल्लीच्या तक्तासमोर आंदोलन करत राहतो तेव्हा मात्र शेतकर्‍यांना समजून घेण्यापेक्षा त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सरकारमधील भाजप करत राहते. यातूनच देशातल्या मोदी सरकारला सर्वसामान्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या पोटापाण्याची चिंता नाही हे उघड होते. पंजाब, हरियाणातील शेतकरी गेल्या पंधरा दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांच्या एक दिवसाच्या देशव्यापी बंदला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तरीही भाजपातले नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार, शेतकर्‍यांचे प्रश्‍न समोर घेऊन बसले नाहीत तर मोदी सरकारचा कायदा समोर घेऊन तो किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयास देशभरात करत आहेत.

रक्ताचा घाम ओकणारा शेतकरी आपला आवाज बुलंद ठेवत आहे. त्याला भाजप सरकारच्या या कायद्याचे तोटे लक्षात आले आहेत. मात्र हरियाणा आणि पंजाबमधील शेतकर्‍यांनी ज्या पद्धतीने आक्रमक स्वरुप घेतला आहे, त्या पद्धतीने देशातील अन्य राज्यातील शेतकर्‍यांनी तो आक्रमक पवित्रा घेतला नसल्याचे कारण पुढे करत भाजप या आंदोलनाबाबत देशभरात संभ्रम आणि दिशाभूल करत आहे. ही दिशाभूल करताना भाजपाचे अनेक मातब्बर नेते याबाबत व्यासपीठावरून बरगळताना दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर या आंदोलनापासून अवघ्या देशाचे लक्ष विचलित करण्याहेतु भाजपाकडून सातत्याने अतिरेक्यांचा, पाकिस्तानाचा आणि हिंदुत्वाचा मुद्या समोर आणला जातो मात्र या स्थितीतही देशभरातील शेतकर्‍यांचं लक्ष शेतकरी आंदोलनातून विचलित होत नाही हे भाजपाच्या लक्षात आलं तेव्हा भाजपाने


आधीच मरकट
त्यात मद्य प्याला

अशा लोकांना आता पुढे केलं की काय? हा प्रश्‍न उपस्थित होतो, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी एक वक्तव्य केलं, दिल्लीत बसलेले हे शेतकरी नसून ते पाकिस्तान आणि चीनचे हस्तक असल्याचे म्हटले.

या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा साक्षात्कार या दानवेंना झाला. याआधीही रावसाहेब दानवे हे जेव्हा राज्यात मंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकर्‍यांबाबत असेच अपमानास्पद विधान केले होते. तुरीच्या प्रश्‍नावर बोलताना दानवे तेव्हा शेतकर्‍यांना म्हणाले होते, ‘यांना कितीही द्या, रडतात साले’ त्याच वेळी एखाद्या मरकट माणसाने मद्य प्यालं की त्याची स्थिती दानवेसारखी होते, असं आम्ही म्हटलं होतं. आज पुन्हा तेच म्हणण्याची वेळ तुमच्या-आमच्यावर आली आहे. दानवेसारखे या देशात असंख्य मरकट मद्य प्यालेले भाजप निवासी दिसून येतात.

देशामध्ये एखाद्या प्रश्‍नावर आंदोलन होत असेल आणि आंदोलनकर्ता जगाचा पोशिंदा असेल तर या देशात सरकार चालवणार्‍यांचे आद्य कर्तव्य ते या आंदोलनकर्त्यांचे समाधान करणे होय. मात्र आंदोलनकर्त्यांचे समाधान तर सोडाच त्या आंदोलनकांमध्ये अतिरेकी आहेत, खलिस्तानवादी आहेत असे म्हणणारे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आपल्याला पहायला मिळाले.

दुसरीकडे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज पुन्हा एक विधान केलं आहे, क्षुद्राला क्षुद्र म्हटलं तर त्यांना राग का येतं? पश्‍चिम बंगाल हे हिंदू राज्य आणि भारत हा हिंदू राष्ट्र होणारच. एवढेच नव्हे तर क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घालावे, या विधानातून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या बगलबच्च्यांना सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांच्या पोटाविषयी, त्यांच्या भविष्याविषयी कुठलच देणंघेणं नाही त्यांना केवळ मुळ प्रश्‍नाला बगल देण्यासाठी भावनेला हात घालायचा आणि ठिकठिकाणी जात-पात-धर्म-पंथावर गरळ ओकत विषवल्ली पेरायची आहे. खरं पाहिलं तर अशा येड्या-घबाळ्यांचे धनी कोण ? हा सवाल उपस्थित करताना ‘यथा राजा तथा प्रजा’ असे उत्तर आल्याशिवाय राहत नाही.

Most Popular

error: Content is protected !!