बीड (रिपोर्टर): बीड शहरातील जुना नगरनाका भागामध्ये पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली तर कधी वॉल बसविण्याच्या नावाखाली तब्बल वर्षभरापासून या भागातील पाणीपुरवठा बंद असून येथील नागरिकांना टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागत आहे. ज्या गुत्तेदारांना पाईपलाईन बसविण्याचे आणि दुरुस्तीचे काम दिले आहे. ते गुत्तेदार आमच्या सोयीने काम करू, तुम्ही सीओकडे जा नाही तर गुत्तेदाराकडे असे बिनधास्तपणे सांगतात. त्यामुळे बीड शहरातील चंपावती शाळेजवळील जुना नगरनाका भाग बीड नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंधारे यांचे प्रशासनावरील पुर्ण नियंत्रण सुटले आहे. गुत्तेदारांवर त्यांचा वचक नाही. गुत्तेदार कशामुळे सीओंना भीत नाहीत. हे सर्वश्रूत आहे. मात्र किमान पिण्याचे पाणी तरी शहरातील नागरिकांना मिळाले पाहिजे. चंपावती शाळेजवळील या भागात रस्त्याच्या दुरुस्तीमुळे पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त व्हायला किमान सहा महिने गेले तर नगरनाक्यावरील वॉल्व बसवायला चार महिने गेले. कसे तरी एक वेळेस पाणी आले आणि पुन्हा या भागातील एक व्हॉल्व तुटला आणि तो काही गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्त होत नाही. याबाबत वारंवार पाणीपुरवठा विभाग आणि गुत्तेदार टंगळमंगळ करतात. या विभागाचे अभियंता कधीही फोन उचलत नाहीत. तर सीओनंतर ज्यांच्याकडे हे नियंत्रणाचे काम आहे त्या किरण देशमुखांचा फोन तर नेहमीच बंद असतो. त्यामुळे बीड नगरपालिकेतील या एरियामध्ये नगरनाका भागात वर्षभरापासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू होणार आहे का? असा प्रश्न या भागातील नागरिकातून विचारण्यात येत आहे.









