
पुणे (रिपोर्टर): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन धीर दिला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, मी सगळी व्यवस्था करतो, तुम्ही घाबरू नका, अशा शब्दात अजितदादांनी पर्यटकांना धीर दिला.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही श्रीनगर येथे अडकल्या आहेत. त्यांच्या फोनवरुन दादांनी सर्वांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जम्मू काश्मीर येथील काही स्थानिक पदाधिकारीही यावेळी पर्यटकांच्या मदतीला धावून गेले.

मला सगळी माहिती मिळाली आहे. माझं मुरलीधर मोहोळ आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी बोलणं झालं आहे. आम्ही सगळी व्यवस्था करतोय, तुम्ही घाबरु नका. आपले बरेच पर्यटक तिथे अडकले आहेत. काही विमानं धाराशिवची हैदराबादला नेतोय, काही मुंबई, पुण्यात करतोय. घाबरु नको, काळजी करु नको, स्वतः अमित शाह तिथे जाऊन बसलेत, मोदी साहेब पण काल रात्री आलेत. असं अजित पवार यांनी सांगितलं.
तिथली सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे, घडू नये ते घडलंय, पण तुम्हाला सुरक्षितरित्या निश्चितपणे आणलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संपर्कात आहेत, मीही संपर्कात आहे. असं अजित पवार म्हणताच फक्त विमानांची सोय झाली ना दादा… तरी पर्यटक निघतील असं रुपाली पाटील म्हणाल्या. यावर विमानांचीच सोय केलेय असं उत्तर दादांनी दिलं. आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरिफ सुरमा भाई आले आहेत असं रुपाली पाटील यांनी सांगितलं. मी मगाशी मुरलीशी बोललोय, त्याने मला तिथे कळवायला सांगितलं आहे असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. दरम्यान अजितदादांना एका पदाधिकार्याकडे फोन दिला असता, रुपाली पाटील म्हणाल्या, की इथे सांगितलं जातंय की विमानं नाहीयेत, पण जास्त विमानं सोडली ना, तर श्रीनगरमधून सगळे निघतील, इथे सगळे प्रचंड भीतीत आणि अडचणीत आहेत.
निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणार्या नराधम दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून वेगवान मोहीम राबवली जात आहे. अशातच प्रशासनाकडून यातील तीन दशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आलं आहे.

आदील भाई यांची मदत शब्दात सांगता येणार नाही -रुपाली ठोंबरे
जम्मु काश्मिरमध्ये अडकलेल्या रुपाली ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, इथल्य स्थानीक आदील भाई यानीं आमच्यातील नाशिकच्या कुटुंबाला जेवणसाठी नेले आणि सुखरुप हॉटेलवर परत आणून सोडले. या हॉटेलमध्ये शंभर पर्यटक अडकलेले आहेत. काहींची फ्लाईट आज, उद्या आणि परवा आहे पण ही सर्व मंडळी आजच्या आजच स्वघरी विमानाने परतली पाहिजे. कोणीही येण्यासाठी तयार नाही. आदीलभाई यानीं जी काही मदत केली ती शब्दात सांगू शकत नाही.






