धक्काबुक्की, हाणामारी; आष्टी, पाटोदा, अंमळनेर पोलीस घटनास्थळी
गाव कडकडीत बंद

आष्टी (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील खडकत मधील चौकात झेंडा लावण्यावरून आणि काढण्यावरून कालपासून दोन गट आमने-सामने आले आहेत. काल तहसीलदारांच्या उपस्थितीत झेंडा काढला गेला मात्र आज गावाबाहेरून शंभर ते दोनशे लोक खडकतमध्ये आले आणि पुन्हा गावात तणावाचे वातावरण निर्माण होत दोन गटात मारामार्याही झाल्या. घटनेची माहिती कळताच आष्टी, पाटोदा, अंमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तेथील तणाव निवळला असला तरी गाव कडकडीत बंद आहे. या प्रकरणी रात्री शंभर ते दीडशे जणांवर जमावबंदीचा आदेश धुडकावल्यासह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल आहे. आज चिघळलेल्या वातावरणात दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या गावात तणावाचे वातावरण आहे.

आष्टी तालुक्यातील खडकत गावात एक चौक असून या चौकामध्ये सुरुवातीपासून एक झेंडा आहे. जयंतीदिनी अन्य एक झेंडा त्याठिकाणी लावण्यात आला. जयंती संपल्यानंतर तो झेंडा काढला जावा, असे काहींचे म्हणणे होते. यावरून काल दोन गट आमने-सामने आले. दोघांमध्ये वाद झाला. याची माहिती प्रशासनाला समजल्यानंतर घटनास्थळी पोलिसांसह तहसीलदार वैशाली पाटील या डेरेदाखल झाल्या. त्यांनी उपस्थित समाजासमोर एक झेंडा हटवला. या प्रकरणी रात्री शंभर ते दीडशे जणांवर जमावबंदी व लोकसेवकाचा आदेश न पाळल्याबाबत गुन्हाही दाखल झाला मात्र रात्री पुन्हा गावाबाहेरून काही लोक खडकत या गावामध्ये दाखल झाले. आज सकाळी पुन्हा झेंड्यावरून दोन गट आमने-सामने आले. दोन गटात शाब्दीक चकमक होऊन हाणामारीचीही घटना घडल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी आष्टी, पाटोदा, अंमळनेर पोलीस डेरेदाखल आहेत.

पोलिसांच्या अन्य दोन तुकड्याही त्याठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत. सध्या गावात तणावपुर्ण वातावरण असून खडकत गाव कडकडीत बंद आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला ताब्यात घेण्यात आलेले नसले तरी प्रशासनाने या घटनेचा व्हिडिओ काढलेला आहे. त्यांनुसार वाद निर्माण करणार्या दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते.






