
शाळेला तीन शिक्षक कमी, मुलांचे शैक्षणिक नुकसान
बीड (रिपोर्टर)- माळापुरी उर्दू शाळेमध्ये तीन शिक्षक कमी असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात आली मात्र याची दखल शिक्षण विभागाकडून घेण्यात येत नसल्याने आज पालकांनी जि.प.च्या प्रांगणात शाळा भरवली होती.
जिल्हा परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळा माळापुरी या शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग असून या शाळेची एकूण पटसंख्या 200 आहे. शाळेला गेल्या वर्षी वर्षभर मुख्याध्यापक पद रिक्त ठेवल्याने मुलांचे खुप शैक्षणिक नुकसान झाले आहे. या चालु वर्षात शाळेतील एकूण मान्य शिक्षक 7 असून फक्त 6 शिक्षक भरण्यात आलेले आहेत, शाळेची विद्यार्थी संख्या 200 आहे. एका वर्गाला शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून ही शाळा ग्रामीण भागातील जास्त विद्यार्थी असणारी शाळा आहे. या शाळेत शेतकरी, मजूर व गोरगरीब कुटूंबातील मुले, मुली, शिक्षण घेत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासाठी या शाळेला एका शिक्षकाची गरज आहे. शाळेतील रिक्त असलेल्या पदावर शिक्षकाची येत्या 3 दिवसांत नियुक्ती करावी. व गोरगरीब कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुलांचे नुकसान होवू देवू नये यासाठी आज जिल्हा परिषद च्या प्रांगणात माळापुरी येथील ग्रामस्थांनी, पालकांनी, आणि विद्यार्थ्यांनी शाळा भरवली होती. येत्या तीन दिवसात शिक्षकाची नेमणुक जर झाली नाही तर दररोज एक वर्ग सीईओ साहेबांच्या दालनात भरविण्यात येईल असा इशारा, माळापुरी चे उपसरपंच बेग समीर कदिर, ग्रा.पं सदस्य यशवंत पडुळे, यास्मिन बेग, यांनी दिला.






