
– 10 जुलै 2025, रात्री 9:58 वाजता, छत्रपती संभाजीनगर एसीबी पथकाच्या कारवाईने खळबळ
– घराच्या झडतीत आढळले 94 हजार रुपये
– मेडिकल नंतर पोलीस करणार न्यायालयात हजर
माजलगाव :(रिपोर्टर) माजलगांव येथील नगरपालिकेचा मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण याला सहा लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 10 जुलै रोजी तक्रारकर्त्याकडून लाच घेताना छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माजलगाव येथील राहत्या घरी केलेल्या झाडाझडतील 94 हजार 800 रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. दरम्यान मेडिकल केल्यानंतर पोलीस प्रशासन लाचखोर मुख्याधिकारी चव्हाण याला न्यायालयात हजर करणार आहेत.
माहितीनुसार,नगरपालिकेचा मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण याच्यावर यापूर्वीच नागरिक नाराज होते.गुरुवारी तक्रारकर्त्याकडून बिल मंजूर करण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली होती.तक्रारकर्त्याने एसीबी पथकाकडे तक्रार केली, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने माजलगांव येथे सापळा रचला.तक्रारकर्त्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केली होती त्यातील सहा लाख रुपये लाच घेताना एसीबी पथकाने चव्हाण याला रंगेहाथ अटक केली.
—–
जामखेड येथील घरी देखील झाडाझडती
मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर माजलगाव येथील किरायाच्या राहत्या घरी झाडाझडती झालीच परंतु त्यांच्या जामखेड येथील घरी देखील एसीबीच्या अधिकार्यांनी झाडाझडती सुरू केली असून अद्यापही ही झाडझडती सुरूच आहे. त्यामुळे या ठिकाणी काही अवैध पैसे अथवा मालमत्ता मिळेल का याकडे लक्ष लागून आहे.









