-मजिद शेख
९६५७६६२७७५
माणसांच्या जीवनात नेहमीच चढ-उतार येत असतात. माणसाचं जगणं तितक सोपं नाही. जगण्यासाठी त्याला प्रचंड धडपड करावी लागते. इतकं सगळं करुनही त्याला निसर्गाची साथ मिळेल याची काही गॅरंटी नसते. निसर्गातील संकटाला तोंड देवून तो पुढे जात असतो. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे. त्याने आता पर्यंत अनेक शोध लावून आपलं जगणं सोप करण्याचा प्रयत्न केला. माणसाच्या आरोग्याचा आणि अन्नाचा आज महत्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञान व औद्योगीकरणामुळे जगात बदल होत आहे. ही बदलाची प्रक्रिया दिवसे-दिवस वाढत आहे. जगात काहीही झालं तरी जगातील माणुस काही दिवस आराम करत बसला असं आज पर्यंत झालं नाही. आणि जग थांबेल याचा विचार कुणी केला नव्हता. मात्र एक असा विषाणू आला त्याने जगाचं वेगाने चालणे थांबवले, जग खरंच काही महिने थांबलं! जगातील अमेरिका, ब्रिटन,जर्मनी यासारखी महासत्ता असलेले देश कोरोनाच्या विषाणूमुळे घायाळा होवून पडली आहेत. जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. आज पर्यंत जगातील अर्थव्यवस्था इतकी बुडाला गेली नव्हती, ती कोरोनाच्या विषाणूमुळे गेली. कोरोना इतका खतरनाक विषाणू असू शकतो याचा विचार कदाचीत आरोग्य विभागाने केला नव्हता. कोरोनाबाबत फक्त वेगवेगळे मतप्रवाह होते. त्याच्या चर्चा केल्या जात होत्या. कोरोना माणसाचं जगणं अवघड करेल आणि कित्येकांना आपल्या कवेत घेईल याचा अंदाज कोणालाच नव्हता.
मार्चपासून सुरुवात
कोरोनाची चर्चा मार्च महिन्याच्या पुर्वी पासून होत होती. जेव्हा कोरोना चीन मध्ये होता. तेव्हा जगात त्याचा प्रसार होईल याचा कुणी विचार केला नाही. चीनमध्ये कोरोना प्राण्यामुळे आला असल्याचा दावा केला जात होता. चीनचे लोक काहीही खातात म्हणुन तेथे कोरोना आला अशी लोकांनी चर्चा उठवली होती. विमान, जहाजामुळे जगात कोठेही जातं येतं. त्यामुळे फक्त चीनमध्ये असलेला कोरोना अवघ्या जगात पसरु लागला. त्याचा प्रसार विमानातून प्रवास करण्यातून झाला. भारतात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने देशात आणीबाणीसारखी परस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाचा प्रसार संसर्गातून होत असल्याने लोकांनी एकमेकांच्या संपर्कात राहू नये म्हणुन पंतप्रधान मोदी यांनी रातोरात देशात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनमुळे देशातील संपुर्ण जनता घरी बसली. ज्यांच्याकडे पैसा होता. अशा लोकांना लॉकडाऊनचा तितका परिणाम जाणवला नाही. जे लोक हातावर पोट भरणारे होते. त्यांची प्रचंड फरफट झाली. त्यांच्या जगण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला. बाहेरच्या राज्यातील लोक कामाच्या ठिकाणी आडकून पडले. कामाच्या ठिकाणी मजुर अडकल्याने त्यांनी काय खायचं हा मोठा प्रश्न होता? अशा लोकांच्या मदतीसाठी देशातील दानशुर मंडळी पुढे आली. जागो-जागी अन्नदान होवू लागलं. मदतीचे यज्ञ सुरु झाले. स्वयंसेवकांच्या मदतीमुळे बेकार आणि मजुरी करणार्या लोकांना आधार मिळू लागला. मदतीत मध्यवर्गीयापासून ते उद्योगपती, फिल्म सीटीतील नट, नटया पुढे आल्या. काहींनी गरीबांना किराणाच्या स्वरुपात मदत केली, काहींनी रोखीने मदत केली. एखाद्या गल्लीत किंवा ग्रामीण भागात कोरोनाचा रुग्ण सापडला की, त्याची जोरदार चर्चा होत होती, लोकांनी कोरोनाची इतकी दहशत घेतली होती की, एखाद्याला कोरोना झाला तर त्याच्या कुटूंबीयाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात होते. सोशल मीडीयातून कोरोना बाबतीत चुकीची माहिती पुरवली जात होती. त्यामुळे लोकात गैरसमज निर्माण होत असल्याने काहींची लोकांना बहिकृत करण्यापर्यंत मजल गेली होती. हे सगळं चुकीच्या बातम्या आणि अफवामुळे झालं होतं. अनेकांना त्याचा खुप त्रास झाला. कोरोनाच्या आडून काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली जात-धर्माची दुकानदारी काही कमी होवू दिली नाही. त्यामुळे काही विशीष्ट धर्मीयांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यात चॉयनलवाल्यांनी जास्तच आग लावण्याचा प्रयत्न केला. मीडीया ही आग लावण्यासाठी असते की, विझवण्यासाठी याची प्रचिती लॉकडाऊनमध्ये आली.
खेडे आणि शहर
नौकरीसाठी किंवा कामासाठी ग्रामीण भागातील माणुस शहराच्या ठिकाणी गेला की, तो तिकडचाच होतो. आपल्या गावाकडे जाण्यास तो इतका इच्छूक नसतो. गाव म्हटलं की, तो नकोच म्हणतो, पण कोरोनाच्या महामारीमुळे लोकांना खेडे आठवले. सगळं बंद असल्यामुळे लोकांना घरातच राहावे लागत होते. जेव्हा लॉकडाऊनमध्ये ढील मिळाली. तेव्हा लोकांचा लोंढा ग्रामीण भागाकडे वळला. ज्या वेळेस कडक संचारबंदी होती, अशा काळात लोक चोरुन आडमार्गाने आपल्या गावाचा रस्ता पकडत होते. कसं-बसं करुन हजारो लोक गावाकडे आले. काहींचे इतके हाल झाले की, त्याचा विचार केला तर अंगावर काटा येतो. चालता-चालता अनेकांचा जीव गेला. औरंगाबाद जवळ रुळावर झोपलेल्या मजुरांना रेल्वेने झोपेत चिरडले होते. ही घटना अत्यंत भीषण होती, लोक भाकरी बांधून गावाची वाट धरत होते. रस्त्यामध्ये प्रवासा दरम्यान, पोलिसांची कारवाई नको म्हणुन लोकांनी शेतातून रस्ता काढत गाव गाठलेलं आहे. गावात आल्यानंतर ही अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत होते. बाहेरुन आल्यांनतर त्याला होम क्वॉरान्टाईन व्हावं लागत होतं. बाहेरचा व्यक्ती म्हटलं की, गावातील लोक त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहत होते. काही गावातील लोकांनी गावाच बंद केलं होतं. पुर्वी गावात माणसं नसायची मात्र कोरोनामुळे गावोगावात माणसचं-माणसं दिसून येत होती. सगळ्यांची ओढ खेड्याकडे असायची, काहीही झालं तरी गावात जावून राहू अशीच मानसीकता निर्माण झालेली होती. जे लोक शहराच्या ठिकाणी किरायाने राहत होते. त्यांनी आपला पसारा घेवून गावात काही महिन्यासाठी मुक्काम ठोकला होता. जेव्हा केरोना जाईल तेव्हा शहराचं बघू असंच जो-तो म्हणत होता.
नौकर्या गमावल्या
बड्या शहराच्या िंठकाणी मोठ-मोठया कंपन्या असतात. या कंपन्यात विविध पदावर ग्रामीण भागातील तरुण मुलं नौकर्या करत असतात. एकीकडे केंद्र सरकारने वर्षाला दोन कोटी तरुणाला नौकर्या देण्याचे आश्वासन दिले होते, हे आश्वासन हवेत विरले पण कोवीडमुळे आहे त्या नौकर्यावर पाणी सोडावं लागलं. लॉकडाऊन झाल्याने कंपन्या बंद करण्याची वेळ अनेक उद्योजकांवर आली. काहींचा व्यवसाय तोट्यात गेल्याने त्यांनी नौकरकपात केली. उद्योजकांनीच काय तर छोटया व्यवसायीकांनी देखील आपल्याकडील एक-दोन असलेल्या नौकरांना कामावरुन कमी केले. इतकी घसरण उद्योग क्षेत्रात आली होती. उद्योग क्षेत्रीतील घसरण ही फक्त भारतातच नव्हती. अवघ्या जगात त्याचे परिणाम झालेले आहेत. छोटया-मोठ्या उद्योगातून मोठी उलाढाल होत होती. त्यामुळे बाजारात चलन फिरत होतं. चलन बंद असल्याने लोकांच्या खिशात पैसा येईना, हात उसणे आणि कर्ज ही कुणी द्यायला तयार नव्हतं. इतकी वाईट अवस्था पाहावयास मिळाली. ज्यांचा व्यवसाय बसला त्यातील बहुतांश लोकांनी भाजी-पाला किंवा दुध विकण्याचे काम केले. इतर व्यवसाय पुर्णंत: बंद होते त्यामुळे भाजीपाला विकून अनेकांनी आपल्या कुटूबंाचा गाडा हाकला. शासकीय नौकरीला असलेल्या कर्मचार्यांचे हाल झाले. कर्मचार्यांचा पगार कपात करण्यात आला. शिक्षकांना राशन वाटपाची ड्युटी करावी लागली. रात्र-दिवस पोलिस रस्त्यावर होते. आरोग्य कर्मचार्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. शासकीय यंत्रणा सगळी कामाला लागलेली होती. ऊसतोड मजुरांना आपल्या गावी परत येण्यासाठी अनेक संकटाचा सामाना करावा लागला. काही महिने मजुरांना कारखाना परिसरात ठेवण्यात आले होते. त्यांच्या जेवणाची सोय प्रशासन आणि सामाजीक संस्थांना करावी लागली होती. मजुरांचे इतके हाल कधी झाले नव्हते ते कोवीडमुळे झाले.
संकटात वर्ष सरलं
जग फास्ट धावत असलं तरी लोक वेळ काढून आपल्या नियोजनानूसार चालत असतात. फिल्मसिटीतून रोज कोटयावधीची उलाढाल होत आहे. पण सगळचं बंद असल्याने सर्वच घरी थांबलेले होते. इतके दिवस घरी बसून नट-नटी बोर झाले होते. कारण एक दिवस ही घरी न थांबणारे काही महिने घरी थांबलेले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात बदल झाला. सोशल मीडीयाचा आधार घेवून जो-तो त्यातून व्यक्त होत होता. काहींनी घरीच जीम सुरु केली होती. तर काही अभिनेते, अभिनेत्री बिल्डींगच्या गच्चीवर वर्कआऊट करत होते. ऐरवी आई-वडील आणि मुलांची सहजा-सहजी भेट होत नव्हती, सगळे घरीच असल्याने मुलं आणि आई-वडील यांना एकत्रीत राहण्याचा आनंद घेता आला होता. शंभर टक्के शाळा अजुन सुरु झालेल्या नाहीत. मार्च महिन्यापासून शाळांना कुलूप आहे. बंदमुळे काहींना घरी राहणं अडचणीचं वाटत होतं. लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीत खुपच घट झाली होती. रस्त्यावरील अपघात थांबले होते. खुन, दरोडे अशा गंभीर घटना कमी झाल्या. मात्र घरगुती हिंसाच्या घटनात मोठी वाढ झाली होती. पर्यावरणात बराच बदला झाला. हवेतील प्रदुषण कमी झालं. कोवडीच्या तणावात हा-हा म्हणता वर्ष संपलं, वर्ष संपलं तरी कोवीड हा पुर्णंता संपलेला नाही. तो कधी संपेल हे कुणीच ठामपणे सांगु शकत नाही. त्याची लस आली असली तरी ती सगळ्यांना मिळालेली नाही. सगळ्यांना लस मिळेल का हे आज सांगता येत नाही. वर्ष संपलं की, लोक नव्या वर्षाच्या स्वागताला उत्सूक असतात. यावर्षी नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा तितका उत्साह लोकात राहिला नाही. कोवडीने अवघ्या जगाचं कंबरडं मोडलं आहे. अनेकांनी कोणाला ना कोणाला गमवलेलं आहे. त्याची वेदना अजुन कायम आहे. इतिहासात या वर्षाची वाईट वर्ष म्हणुन नोंद झाली. येणारं नवीन वर्ष कसं जातं याचा जो-तो विचार करत आहे. नव्या वर्षाच्या पोटात काय आहे हे आज तरी सांगता येत नाही. कोवीडने माणसांची जीवन शैलीच बदलून गेली आहे. अशी जीवन शैली कधी ही कोणत्याही महामारीने बदलली नव्हती.