सिंदफणा नदी पात्रात एका जेसीबीसह दोन ट्रॅक्टर पकडले होते
बीड (रिपोर्टर)- सिंदफणा नदीच्या पात्रातून गेल्या अनेक महिन्यापासून अनाधिकृत वाळुचा उपसा सुरू आहे. वाळु माफियांनी अगदी उच्छाद् मांडला असतानाही महसूल आणि पोलिस प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाहीत. काल वाळू उपसताना दोन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी पकडण्यात आला होता. मात्र या प्रकरणी कुठलीही कारवाई न करता संबंधित पोलिस परत गेल्याने या बाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
बीड तालुक्यातील कुक्कडगाव, खुंड्रस, चव्हाणवाडी आणि भाटसांगवी परिसरातील सिंदफणा नदीच्या पात्रातून बेसुमार अनाधिकृतरित्या वाळुचा उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच वाळु उपसण्यावरून माफियात हाणामारीची घटना घडली होती. महसूल विभागाने काही वाळुचा साठा जप्त केला होता. मात्र जप्त केलेला वाळुचा साठाही चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. आजही नदीपात्रातून वाळुचा उपसा सुरुच आहे. काल वाळु उपसताना एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. या वाहनांवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. कारवाई का करण्यात आली नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.