
आंदोलनाच्या घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी चर्चेची दारे उघडली
ओएसडी म्हणाले, काही अडचण आहे का हे विचारायला आलो
अंतरवली सराटी (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्ते 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. गणेश उत्सवाचा सण मुंबई मोठ्या उत्साहात साजरा होत असताना हे आंदोलक त्याठिकाणी डेरेदाखल होत असल्याने पोलीस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा ताण पडणार हे उघड. अशा स्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी थेट अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यामुळे या आंदोलनाबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत असून सरकारने हे आंदोलन आता गांभीर्याने घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांचे स्वियसहाय्यक यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा केली आहे.
आज मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवली सराटीमध्ये डेरेदाखल झाले, या वेळी त्यांनी जरांगे यांच्या सोबत चर्चा केली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना राजेंद्र साबळे म्हणाले की, मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काही अडचण आहे का हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, असं म्हणत माध्यमांसमोर अधिकचं बोलणं त्यांनी टाळलं. मात्र उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील दहा दिवस हे गणेशोत्सवाचे धामधुमीचे असतील या काळात मराठा आंदोलक मुंबईत आल्यास पेचप्रसंग व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी चर्चेची दारे खुली केल्याचे दिसून आले. राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले, मुंबईतील मोर्चावर आपण ठाम आहोत.
जे बोलायचं ते तुमच्या समोर बोलेल. एक रस्ता आम्हाला द्या, तो कोणताही द्या, हजार रस्ते आहेत, एक द्या, मी मोर्चावर ठाम असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले. पुढे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा आणि कुणबी एक आहेत, याचे सरकारी दस्ताऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप वगैरे कशाला हवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो. त्यांनी कधी इतकी फुलं बघितली नसतील, वास मारणारी, बिगरवासाची सगळी फुलं आणतो. फडणवीस साहेबांचा बंगला नाय गुलाबाच्या पाकळ्यांनी भरुन काढला तर नाव बदलेन माझं. उगाच गोरगरीबांच्या लेकरांची का नाराजी घेता? मला जेलला टीका, मी सडायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्हाला आरक्षण देतो, तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या, तरीही मी तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.






