
अस्तित्वाच्या लढाईसाठी मराठा साम,दाम,दंडाने आंदोलनात
बीड, (रिपोर्टर)ः- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उभारलेल्या आंदोलनाला राज्य सरकार सहकार्य करत नाही. आंदोलकांना खायला भाकरी आणि प्यायला पाणी मिळत नाही अशी ओरड झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यात गावा गावात दवंड्या ऐकाव्यास मिळत असून जिल्ह्यातल्या काही गावांनी चटणी भाकर, पिटलं भाकर घेवून मुंबईकडे कुच केली आहे. काही जणे आज सकाळीच मुंबईत पोहंचले आहेत. गुंदेवाडी येथील गावकर्यांनी 300 ते 400 लोकांच्या भाकरी मुंबईत पोहंचत्या केल्या आहेत. पिंपळवंडीतूनही भाकरी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
मराठा समाज अस्तित्वाची लढाई म्हणून या आंदोलनाकडे पाहत आहे. दोन दिवस प्रचंड पावसामुळे आंदोलकांचे हाल झाले. राज्य सरकारने आणि गृह विभागाने जाणीवपुर्वक आंदोलन स्थळी अथवा आंदोलक ज्या भागात आहेत त्या ठिकाणच्या खाऊ गल्ली, दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे काल लोकांना खायला मिळाले नाही पाणी प्यायला मिळाले नाही. ही ओरड झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातून चटणी भाकर, पिटलं भाकर घेवून लोक आंदोलनाकडे कुच करत आहेत. मुंबईकरांनीही आज आंदोलकांची खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यास सुरूवात केली आहे. नजीकच्या गावामधूनही आंदोलकांना जेवण घेवून लोक येत आहेत.







