
गोरगरिब रुग्णांचे मात्र हाल
परळी वैजनाथ
सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या परळी उपजिल्हा रुग्णालयात जनरल फिजिशियन डॉक्टर नसल्याने अतिदक्षता विभाग (खउण) बंद आहे लाखों रुपयांचे वैद्यकीय साहित्य धूळखात पडून आहे. तसेच अत्यावश्यक रुग्णांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद दवाखाना अथवा खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे.
परळी शहरातील मध्यवर्ती भागात 100 खाटांची क्षमता असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दररोज दीड हजार रुग्ण तपासणीसाठी येत असतात. अस्थिव्यंग तज्ञ, बालरोगतज्ज्ञ सह विविध तज्ञ डॉक्टर, सिटी स्कॅन, डायलेसीस सेंटर, सोनोग्राफी, एक्स रे सह विविध तापसण्यांची सुविधा उपजिल्हा रुग्णालयात असल्याने परळी शहरासह तालुक्यातून रुग्णांची संख्या जास्त आहे. सुसज्ज ऑपरेशन थेटर असल्याने रोज 5 ते 6 शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयात केल्या जातात. आवश्यक असेल तर सिझेरियन केले जात असल्याने शहरात सर्वात जास्त प्रसूती उपजिल्हा रुग्णालयात होतात.
उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. या अतिदक्षता विभागात 40 बेड आहेत. तर बालरुग्ण विभागात 32 बेड आहेत. अतिदक्षता विभागासाठी लागणार्या सर्व यंत्रसामग्री रुग्णालयात पहिल्या मजल्यावर विभागात बसवण्यात आल्या आहेत. या अतिदक्षता विभागासाठी जनरल फिजिशियन डॉक्टर ची आवश्यकता असते. काही महिन्यांपूर्वी जनरल फिजिशियन ची नियुक्ती करण्यात आली होती मात्र संबंधित डॉक्टर ने उपजिल्हा रुग्णालयात येण्याआधीच रजा टाकून बदली करून घेतली. त्यानंतर कोणीही जनरल फिजिशियन डॉक्टर न आल्याने अतिदक्षता विभाग बंद अवस्थेत आहे. लाखों रुपयांची यंत्रणा वापरावीणा धूळखात पडून आहे.
परळी वैजनाथ येथे थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, राख वाहतूक व्यवसाय, रेल्वे स्टेशन असल्याने अनेकवेळा अपघात घडल्यास उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णास आणले जाते. अतिदक्षता विभाग चालू नसल्याने गंभीर रुग्णास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालयात पाठवले जाते. मात्र अनेकवेळा रुग्ण गंभीर असल्यास वाटेतच मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात.
अतिदक्षता विभाग सुरू नसल्याने लाखो रुपयांचा मशीन धूळखात पडून आहेत. गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे यामुळे जनरल फिजिशियन डॉक्टर ची त्वरित नियुक्ती करण्यात येऊन अतिदक्षता विभाग (खउण) सुरू करण्यात यावा अशी मागणी परळीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.









