
प्रशासनाला मृत्यू पाहिल्यावर जाग येणार का?
आष्टी ( रिपोर्टर ):-
तालुक्यातील धानोरा ते लोणी सय्मदमीर या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेक अपघात होऊन नागरीकांचे हात पाय मोडत आहेत.रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने, नागरिकांना जिवाची कसरत करीत जीवघेण्या खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.यामुळे या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची प्रवासासाठी गैरसोय होत आहे.मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट बघत आहे की काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये पडत आहे. मुळात या रस्त्याची डागडुजी 2 ते 3 वेळा झालेली आहे.रस्ता हि उत्तम दर्जाचा नसल्याने नवीन रस्ता करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर या गावची सुमारे 7 हजार लोकसंख्या आहे.या रस्त्यावरुन धानोरा,खुटेफळ , सोलापूर वाडी,पिंपळा,लोणी सय्मदमीर या गावातील ग्रामस्थांची दळवळण सेवा या मार्गावर अवलंबून आहे.या गावांना आजतागायत डांबरी रस्त्याचे स्वप्नही साकार झालेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची चिखलमय व धोकादायक अवस्था गावकर्यांसाठी अक्षरशः जीवघेणी ठरते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, पाण्याचे डबके,आणि निसरडी चिखलवाट यामुळे नागरिकांना दूग्धविकास, बाजार ने आण करण्यासाठी,तसेच दवाखान्यापर्यंत पोहोचणे हेही धोक्याचे काम झाले आहे.विशेषत: गरोदर महिलांना आणि रुग्णांना ने-आण करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.या गंभीर परिस्थितीवर आजपर्यंत प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने गावकर्यांमध्ये संताप उसळला आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,एखादी मन हेलावणारी घटना घडल्यावर जागे होण्यापेक्षा आजच पावले उचलावीत; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट बघत आहे की काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये पडत आहे.
मानवी जीवाचे मोल कोणत्याही व्यवसायापेक्षा आणि विकासापेक्षा अधिक आहे. एखाद्याला तातडीने जर हॉस्पिटल मधे दाखल करायचे असेल तर या रस्त्यामुळे प्राण मधेच गमावण्याचा धोका अधिक आहे.म्हणूनच सदरचा रस्ता सुरक्षित व्हावा हीच जनतेची आणि आमची ठाम मागणी आहे.
– बाबू देवकर ( माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते )










