
जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला , संध्याकाळी राज्य शासनाकडे अहवाल जाणार
जिल्ह्यात 5 लाख 92 हजार हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान
बीड (रिपोर्टर): सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील शेतीचे झाले असून राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी मदत जाहीर केली. जिल्हा प्रशासनाने मदतीबाबतचा अहवाल तयार केला असून हा अहवाल आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडे जाणार आहे. जिल्ह्यासाठी पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील 5 लाख 92 हजार हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर इतरही मोठी हानी झालेली आहे.
राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यामध्ये तर कहरच झाला. अतिवृष्टीने मराठवाड्यातील सर्व नद्यांना महापूर आले होते. त्यामुळे नदीकाठची शेती पूर्णत: खरडून गेली. नदीचे पाणी शेतात घुसल्याने पिके पाण्यात गेले, जमीनी वाहून गेल्या. शेती पिकांचे कधी नव्हे ते आतोनात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले. त्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. पंचनामे झाल्यानंतर राज्य सरकारने मदतीची घोषणा केलेली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा संपूर्ण एकत्रित अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आज संध्याकाळी राज्य सरकारकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील 5 लाख 92 हजार हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान कापूस आणि सोयाबीनचे झाले. आठ लोकांचा विविध घटनेत मृत्यू झाला. अनेक शेतकर्यांची जनावरे वाहून गेली. पावसाने कित्येकांच्या घरात पाणी घुसल्याने नुकसान झाले. या सर्व नुकसानीसाठी पाचशे कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार्यांची बैठक
नुकसानीबाबतचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आला असून या संदर्भात आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नियोजन विभागामध्ये बैंक सुरू होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.







