
बीड (रिपोर्टर): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. काल बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षण जाहीर होतााच अनेक भावी सदस्यांनी सोशल मिडियाद्वारे ‘लढेंगे और जितेंगे’ अशा पद्धतीच्या पोस्ट टाकून निवडणुक प्रचाराला एकप्रकारे सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 तर पंचायत समितीचे 122 गण आहेत. या गटातून आणि गणातून शेकडो कार्यकर्ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती आली असून जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष, पं.स. सभापतींचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद गट, पं.स. गण, नगरपालिका प्रभागांचेही आरक्षण जाहीर झाले आहे. काल बीड जिल्ह्यातील जि.प. गट व पं.स.चे आरक्षण जाहीर झाले. आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया सुखद होत्या तर काहींच्या दु:खद होत्या. कारण काहींसाठी गण-गट सोयीचे तर काहींना अडचणीचे ठरणार आहेत. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी सोशल मिडियाद्वारे प्रचाराला सुरुवात देखील केली. लढेंगे जितेंगे अशा पद्धतीच्या पोस्ट करण्यास सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातून शेकडो भावी सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामीरण भागासह शहरी भागातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे.
000








