साठ ते सत्तर शेतकर्यांच्या शेतातील विद्युत मोटारींच्या वायरची चोरी
घटनास्थळी श्वानपथ, फिंगरप्रिंट पथक दाखल
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीत पंचनामा सुरू
मस्साजोग (रिपोर्टर): मस्साजोगचे तत्कालीन सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या घरासह अन्य तीन घरांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी रात्री मस्साजोगमध्ये धुमाकूळ घालत लुटालूट केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तीन ठिकाणी चोर्या करून चोरट्यांनी मस्साजोग परिसरातील पन्नास ते साठ शेतकर्यांच्या शेतातील विद्युत मोटारींचे वायर चोरून नेले तर काही ठिकाणी ते वायर जाळल्याचेही निदर्शनास आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह श्वानपथ, फिंगरप्रिंट पथक डेरेदाखल झाले असून चोरट्यांनी संतोष देशमुख यांच्यासह अन्य तिघांच्या घरातून किती रुपयांची रोकड आणि दागिने पळविले याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक असे की, केज तालुक्यातील मस्साजोग येथे मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला. स्व. संतोष देशमुख यांच्या घराचे दार तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तिथे कपाटाची उचकाउचकी करत तेथून काही रोकड लंपास केली. पुढे हे चोरटे गावातील अच्यूतराव देशमुख यांच्या घराला लक्ष्य करत त्याठिकाणावरून दोन ते तीन तोळे सोने व नगदी रोकड चोरली. पुढे या चोरट्यांनी प्रवीण श्रीधर देशमुख यांच्या घरीही चोरी केली. सुधाकर सोनवणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडल्याचे सांगण्यात येते. या चोर्या करताना चोरट्यांनी काही घरांना बाहेरून कड्या लावल्या. गावामध्ये तीन ते चार ठिकाणी चोर्या केल्याचे निदर्शनास आले. त्यापाठोपाठ साठ ते सत्तर शेतकर्यांच्या शेतातील विद्युत मोटारीच्या वायरची चोरी झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. चोरट्यांनी अनेक शेतकर्यांच्या शेतातील वायर चोरले. त्याचबरोबर काही ठिकाणी नासधूस करत वायरची जाळपोळही केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह एलसीबी, दरोडा प्रतिबंध पथ, श्वानपथक, फिंगरप्रिंट पथक घटनास्थळी डेरेदाखल झाले. पोलिसांचा पंचनामा सुरू असून या चोरीत नेमके कोणाचा किती ऐवज आणि रोकड चोरीस गेला हा आकडा प्राप्त होऊ शकला नाही. पोलिसांचा पंचनामा सुरू असून चोरटयांचा माग घेण्याचा प्रयत्न पोलिसांडून केला जात आहे. स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग हे गाव राज्यभरात चर्चेत आलेले आहे. त्यापाठोपाठ आज त्यांच्या घरासह अन्य ठिकाणी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.









