गेवराई(रिपोर्टर) सहकार सोसायटीच्या निवडणुकीत सरपंचाचे पॅनल पडल्याने त्यांनी शहाजानपूर चकला येथील पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत मादळमोही येथे काल दुपारी रस्ता रोको केला. या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
गेवराई तालुक्यातील लोळदगाव, शहाजानपूर चकला आणि अनकोटा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. तिन्ही गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. मंजूर योजनेतून गावाला सुरळीत पाणी पुरवठा सुरू होता. शहाजानपूर चकला येथील सोसायटीच्या निवडणुकीत एका गटाचे पॅनल विजयी झाले तर दुसर्या गटाचे सर्व उमेदवार पडले. त्यामुळे सरपंच व इतर लोकांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून शहाजानपूर चकला येथील पाणीपुरवठा बंद केला. गावातील विहिर पुर्णपणे भरलेली आहे. केवळ राजकीय वैमनस्यातून नागरिकांना त्रास देण्याचे काम सरपंच करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. शिवाय गावात इतरही कामे अर्धवट आहेत. याबाबत नागरिकांनी पंचायत समिती विभागाकडे तक्रार दिल्यास त्यांना धमक्या दिल्या जातात. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शहाजानपूर चकला पाणीपुरवठा योजनेत लक्ष घालावे या मागणीसाठंी मादळमोही येथे महिलांनी रस्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले.