केज (रिपोर्टर) बिल्कीस बानो प्रकरणातील नराधम आरोपींना पून्हा शिक्षा ठोठवावी या मागणीसाठी आज शहरातील हजारो मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या. सकाळी या मोर्चाला हजरत खाजॉ मोहज्जेबोद्दी दर्गा येथून सकाळी 11 वा. सुरूवात झाली. सदरील हा मोर्चा केज तहसिलवर गेल्यानंतर त्याठिकाणी पाच महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना दिले. पोलिस प्रशासनाने जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चाला विविध पक्ष संघटनांनी पाठींबा दर्शवला.
गुजरात येथील बिल्कीस बानो हिच्यावर नराधमांनी अत्याचार केला होता. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गेल्या काही दिवसापूर्वी गुजरात सरकारने या नराधमांची सुटका केल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नराधमांनी पुन्हा शिक्षा ठोठावी. या मागणीसाठी आज केज शहरामध्ये मुस्लिम महिलांनी भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा दर्गापासून निघाला होता. तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर त्याठिकाणी पाच महिलांनी तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चाला सकल मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय छावा संघटना, रिपाई, दलित अन्याय अत्याचार समिती, जनविकास परिवर्तन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, शिवसंग्राम, माजी सैनिक संघटना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठींबा दर्शवला.
लेकरा-बाळासह महिला सहभागी
अल्पसंख्यांक समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराविरोधात पहिल्यांदाच केजमध्ये प्रचंड संख्येने महिला आपल्या लेकरा-बाळासह सहभागी झाल्या. मोर्चाचे योग्य नियोजन करण्यात आले होते. मोर्चा शिस्तबध्द पध्दतीने तहसिलवर धडकत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
परळीत महामहीम यांना निवेदन
परळी (रिपोर्टर) संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी परळीमध्ये तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाभरातील तालुकास्तरावर झालेल्या संविधान बचाओ आंदोलनात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रमाणे परळीतही महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे लिहिलेले निवेदन तहसिलदारांच्या हाती देण्यात आले. बिल्कीस बानो प्रकरणी आज जिल्हाभर महिलांनी आक्रमक होत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परळीतही संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले.
अंबाजोगाई शहरात तहसिलवर मोर्चा
अंबाजोगाई (रिपोर्टर) बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना पून्हा कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी या मागणीसाठी अंबाजोगाई शहरात मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये प्रत्येक घरातील महिला सहभागी झाली होती. अत्यंत चांगले नियोजन मोर्चेकरांनी केले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
अंबाजोगाई शहरात आज भव्य दिव्य मोर्चा निघाला. सकाळी 12 वा. मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चामध्ये अंबाजोगाई शहरातील प्रत्येक घरातील महिला सहभागी झाली होती. बिल्कीस बानो प्रकरणातील नराधम आरोपींना पून्हा शिक्षा ठोठावण्यात यावी. ईशनिंदेविरोधात कायदा करावा अशी मागणी आंदोलन कर्त्या महिलांनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आले.












