अचानक दोन ते तीन ठिकाणी केंद्रेकरांकडून पाहणी
गेवराई (रिपोर्टर) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. डॅमेज भरपूर आहे, पंचनामे करण्याचे आदेश सर्व ठिकाणची पाहणी केल्यानंतर देणारच आहे, असं म्हणत आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत गेवराईत रस्त्यावरील काही शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. गेवराई तालुका प्रशासनाने जो स्पॉट दाखवला तो तर केंद्रेकरांनी पाहिलाच परंतु रस्त्याने जाताना अचानक एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली. थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले, त्याठिकाणी शेतकरी चिखलामध्ये कापसाची वेचणी करत होते. शेतकर्यांनी केंद्रेकरांना पाहताच आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. तेव्हा केंद्रेकरांनी नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, हे सांगायची गरज नाही. आपणाला मदत मिळेल, वस्तूस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे उपस्थित शेतकर्यांना केंद्रेकरांनी आश्वासीत केले.
बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडून शेतातील पिके उद्ध्वस्त करून टाकले. रडकुंडीला आलेल्या शेतकर्यांना शासन-प्रशासन दरबारातून अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही. शेतकर्यात शासन-प्रशासनाविरुद्ध संताप असतानाच आज आयुक्त सुनील केंद्रेकर हे शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात डेरेदाखल झाले. औरंगाबादहून येताना त्यांनी गेवराईत पाहणी केली. गेवराई तालुका प्रशासनाने बायपासवर एक पाहणीसाठी स्पॉट चॉईस केला होता. त्याठिकाणची पाहणी झाल्यानंतर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तालुका प्रशासनाच्या चॉईसपेक्षा रस्त्यावरून जाताना अचानक एका ठिकाणी गाडी थांबविली आणि थेट ते कापसाच्या पिकात डेरेदाखल झाले. उरलासुरला कापूस वेचताना उपस्थित शेतकर्यांनी केंद्रेकरांना पाहताच व्यथा मांडायला सुरुवात केली. आयुक्त सुनील केंद्रेकर चिखल असलेल्या शेतात शेतकर्यापर्यंत गेले. त्याच्यासोबत चर्चा करत आणि पीकांची पाहणी करत नुकसान मोठे असल्याचे सांगितले. आज आपण बीड, आष्टी, पाटोदा या भागात पाहणी करणार आहोत, असेही केंद्रेकरांनी या वेळी म्हटले. डॅमेज मोठे आहे, नुकसान झाल्याचे सांगण्याची गरज नाही, ते समोर दिसूनच येत आहे. एकदा पाहणी झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जाणार असल्याचे आयुक्त केंद्रेकर यांनी रिपोर्टरला सांगितले. गेवराईमध्ये जेव्हा आयुक्त सुनील केंद्रेकर पाहणी करत होते त्यावेळेस त्यांच्या सोबत आ. लक्ष्मण पवार, तहसीलदार सचीन खाडे, मंडल अधिकारी जितेंद्र लेंडाळे, कृषी विभागाचे चव्हाण, शेतकरी नेते उद्धव घोडके, नानासाहेब पवार, जे.डी. शहा यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. गेवराई तालुक्याची पाहणी केल्यानंतर ते पुढे बीडवरून पाटोदा, शिरूर, आष्टी भागात पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.