नागपूर (रिपोर्टर) मंत्री चंद्रकांत पाटील यांचं ’भीक मागितली’ या वक्तव्याचा धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विनाअनुदानित शाळेच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या धोरणावर उपहासात्मक टीका केली. शाळेसाठी सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करुन एकप्रकारे येणार्या काळातली राज्य सरकारची भूमिकाच स्पष्ट केली होती. त्यावर आज विधानसभेत बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्या गळ्यातील मफलर पसरत विनाअनुदानित शाळावाल्यांनी भीक मागितली तर चालेल का? असा उपहासात्मक सवाल केला. पण बचावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्काळ उभे राहिले. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण समोरच बसलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र फडणवीसांना हा वाद निकाली काढण्याची सूचना केली अन् फडणवीसांनी राज्य सरकारची भूमिका रोखठोक शब्दात स्पष्ट करताना एकप्रकारे चंद्रकांतदादांचीच अडचण केली.
विधानसभेत काय घडलं?
विनाअनुदानित शाळा आणि अनुदानाच्या मुद्द्यावर विधासभेत चर्चा सुरु होती. त्यावर निवेदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. आता इथून पुढच्या काळात अनुदानित शाळा देता येणार नाही, हा आपला कायदा आहे, असं फडणवीस यांनी नि:क्षून सांगितलं. त्यांच्या निवेदनानंतर छगन भुजबळ बोलायला उभे राहिले.