‘तो’ राठोड पोलीस कोण? एसपीसाहेब, शोधा, कारवाई करा
तोडपाणीत एका राजकीय पुढार्याचाही समावेश
बीड/गेवराई (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात गुटखा माफियांची अन् हप्तेखोर पोलिसांची चर्चा नवी नाही. आता काही राजकीय नेते तोडपाणीत उतरल्याचे बोलले जात असून काल दुपारी गेवराई तालुक्यात पांढरवाडी शिवारात गोवा गुटख्याची एक ट्रक पकडण्यात आली. राजकीय पुढारी, लाचखोर पोलीस व गुटखा माफियात तोडपाणीवर चर्चा होत राहिली. मनासारखी तोहपाणी झाली नाही. सरशेवटी दुपारी पकडलेली गुटख्याची गाडी रात्री आठ ते नऊ वाजता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. मात्र गाडीमधून 15 लाख रुपयांचा गुटखा एका शेतात राठोड नामक पोलिसांच्या संगनमताने उतरवून घेतल्याची खळबळजनक माहिती समोर येत असून सदरच्या गाडीला जीपीएस असल्याने गाडी कुठे कुठे फिरली हे समोर येईल. यातून पुन्हा एकदा पोलिसांची हप्तेखोरी समोर आली आहे.
काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका राजकीय पुढार्याने गोवा गुटख्याची गाडी गेवराई तालुक्यात अडवली. सदरची गाडी ही पांढरवाडी शिवारात दुपारपासून होती. याठिकाणी गुटखा माफिया आणि पोलिस व संबंधित पुढार्यात तोहपाणीचे व्यवहार सुरू झाले. राठोड नावाच्या पोलिसाने या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर पैसे मागितले. मात्र मनासारखी तोहपाणी होत नाही. तेव्हा संबंधित पोलीसाने सदरच्या ट्रकमधील 20 पोते गोवा गुटखे एका शेतात उतरवून घेतले. त्याची किंमत अंदाजे 15 लाखांच्या आसपास असल्याचे बोलले जाते. त्यानंतर मिडिया व पोलिसांना बोलावून सदरची गाडी गेवराई पोलिसांच्या हवाली करण्यात आली. विशेष म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून ही गाडी पांढरवाडी शिवारात होती त्याची माहिती रिपोर्टरकडे आहे. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री दहा वाजल्यापर्यंत तोडपाणीचा खेळ सुरू होता. संबंधित राठोड नावाचा पोलीस आपल्या डिझायरमध्ये पहावयास मिळाला. जेव्हा गुटख्याची गाडी ही पोलीस ठाण्यात नेली जात होती त्यावेळेस त्या गाडीच्या पाठीमागील पडदा खुला झालेला दिसून येत होता त्यामुळे बंद गुटख्याची गाडी कुठेतरी उघडली गेली. हे स्पष्ट होते. एकीकडे सर्रासपणे गुटख्याचा व्यवहार होत असताना दुसरीकडे मात्र पोलीस जाणीवपुर्वक जुन्या गुटखा माफियावर गुन्हा दाखल करत असल्याचे दिंद्रुड प्रकरणात समोर आले. गेवराईमध्ये पकडण्यात आलेला गुटखा आणि पोलिसांनी एका शेतात उतरवून घेतलेला गुटखा ज्या ट्रकमधून उतरवून घेतला त्याचे जीपीएस लोकेशन काढले तर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल. या गाडीवरचा चालक हा फरार असल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून गुटखा उतरवून घेणार्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.