
वाळू काढणार्या केन्यांसह चार ट्रॅक्टर जप्त
छाप्या दरम्यान वाळू माफिये पळाले, एक ताब्यात, 23 लाखांचे साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात
गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यात गोदावरी पात्रातून सातत्याने अवैधरित्या वाळुचा सर्रासपणे उपसा केला जातो. याबाबत अनेक वेळा माध्यमांसह स्थानिक नागरीकांकडून तक्रारी करण्यात आल्या मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते. आज मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात माफियांकडून वाळू उपसा होत असल्याची माहिती झाल्यानंतर त्यांनी पहाटेच्या दरम्यान छापा मारला आणि घटनास्थळावरून चार ट्रॅक्टरसह केन्या असा तब्बल 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या वेळी वाळू उपसा करणारे अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले मात्र एकास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. सदरची कारवाई ही खामगाव शिवारात करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील खामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रामध्ये वाळू उपसा हाते असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला झाल्यानंतर आज पहाटेच्या दरम्यान या पथकाने खामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा मारला. तेव्हा त्याठिकाणी केन्याद्वारे वाळू उपसा करून ही वाळू ट्रॅक्टरमध्ये टाकून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी जात वाळू उपसा करणार्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला मात्र पहाटेच्या अंधारात अनेकजण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र एका जणास पोलिसांना पकडता आले. या वेळी घटनास्थळावरून वाळू काढण्यासाठी लागणार्या केन्या, चार ट्रॅक्टर असा तब्बल 23 लाख रुपयांचा वाळूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीसह जप्त करण्यात आलेले साहित्य गेवराई पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, व त्यांच्या टीमने केली.









