बीड- ऑनलाईन रिपोर्टर
बीड शहरातील नामांकित आदित्य महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमधील वादाचे गंभीर रूपांतर होत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय देशमुख या विद्यार्थ्याने आदित्य सुनील गाडे या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गाडे यांच्या छातीवर वार झाला असून त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रसंगावधान राखत गाडे यांच्या मित्राने पुढील वार होण्यापासून त्यांना वाचवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जखमी आदित्य गाडे यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अक्षय देशमुख याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाविद्यालय परिसरात अचानक घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शिस्तीचे नियम अधिक कडक करावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेत अंतर्गत चौकशी सुरू केली असून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.






