अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ परिसरातील बाराभाई गल्ली येथील एका व्यापार्याचे घर चोरट्यांनी फोडून घरात धाडसी चोरी करत 11 लाखांची चोरी केल्याचे समोर आले आहे. घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरून परिसरात खळबळ उडाली आहे.
घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. घरफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही च्या आधारेच घरमालक मोहम्मद अलीमुद्दीन कारीमुद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मोहम्मद अलीमुद्दीन यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून ते आपल्या कुटुंबासह एपीजे अब्दुल कलाम शादीखाना शेजारी त्यांचे घर असून दि. 28 जानेवारी रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लाऊन ते आपल्या कुटुंबासह पाथरी येथे त्यांच्या मुलाच्या घराचे चालू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. घराला लावलेले कुलूप पाहून व त्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी 29 जानेवारीच्या मध्यरात्री 1:25 वाजेच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश करून त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम यावर डल्ला मारून त्यांनी पोबारा केला. दुसर्या दिवशी दुपारी त्यांच्या दुकानातील कामगाराने घर उघडे असल्याचे फोनवरून कळवले. त्यानंतर मोहम्मद अलीमुद्दीन हे घरी आल्यानंतर त्यांना आपली घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली.
चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या आणि चेन असे सुमारे 8 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच कपाटात ठेवलेली 4 लाख रुपयांची रोकडही चोरून नेली. घर मालकाच्या तक्रारी वरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळा जावून तेथील घडलेल्या घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे.






