माजलगाव : ऑनलाईन रिपोर्टर
तालुक्यातील डुब्बा मांजरा गावालगत वाहणाऱ्या सिंदफणा नदीच्या पात्रात एका महिलेचा सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीकाठी सरपण आणण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हा सांगाडा दिसून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, डुब्बा मांजरा गावाजवळील सिंदफणा नदीकाठी काही ग्रामस्थ सरपण गोळा करण्यासाठी गेले असता झाडाझुडपांमध्ये मानवी सांगाड्यासारखी वस्तू आढळली. जवळ जाऊन पाहिले असता तो मानवी सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात सांगाड्यावर काळ्या रंगाचा ब्लाउज आढळून आल्याने तो महिलेचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मृतदेहाला सुमारे तीन ते चार महिने उलटले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने हा सांगाडा आता उघडकीस आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहत आला की अन्य काही कारण आहे, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
पोलिसांनी सांगाड्याचे नमुने पुढील तपासणीसाठी अंबेजोगाई व छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्याची तयारी सुरू केली असून, तपास अहवालानंतर मृत महिलेची ओळख आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेचा पंचनामा पोलीस देवकते, पीएसआय राठोड तसेच पोलीस अंमलदार विष्णू मेत्रे यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.












