बीड (रिपोर्टर): केज तालुक्यातील होळ येथे काल सायं. 5 वा. भरधाव इनोव्हा कारने अॅपे रिक्षाला दिलेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर आठजण गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यातील आणखी चौघाजणांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूची संख्या आठवर गेली असून आणखी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.
केज येथील रहिवाशी मच्छिंद्रसिंह चरणसिंह गोके (वय 35) हे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत अंबाजोगाई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलाचे केज येथे निधन झाले होते. गुरूवारी ते केज येथील सावडण्याचा कार्यक्रम आटपून गोके कुटुंबिय आणि नातेवाईक अॅपे रिक्षातून अंबाजोगाईकडे निघाले होते. होळच्या विद्युत उपकेंद्राजवळ त्यांचा रिक्षा आल्यानंतर समोरून आलेल्या भरधाव वेगातील इनोव्हा कारने त्यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षातील चालक बालाजी संपती मुंडे (वय 28), मच्छिंद्रसिंग चरणसिंग गोके (वय 46) यांच्यासह प्रिया कौर दिपकसिंग कौर (वय 2) आणि वीरसिंग दिपकसिंग गोके (वय 6 महिने) या दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 9 जण गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री उशिरा या जखमींपैकी दिपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके (वय 27), भारती कौर दिपकसिंग गोके (वय 25) हरजितसिंग बादलसिंग टाक (वय 26) रा.जालना आणि चंदाकौर बादलसिंग टाक (वय 45) रा. जालना या चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात मच्छिंद्रसिंग गोके सह त्यांचा मुलगा सुन, नातवंडे मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबिय जवळपास संपले आहे. दरम्यान अपघातात जखमी असलेल्या अन्य काहीजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत युसूफवडगाव पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.