आष्टी (रिपोर्टर):- अंत्यविधीसाठी जाणार्या शिक्षकाची कार दोनशे फूट दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना आज सकाळी बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात घडली. अंबादास पांडुरंग उगले (वय वर्षे 46) असे अपघातातील मृत शिक्षकाचे नाव आहे. कार दोनशे फूट दरीत कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला होता. घटनेची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर नागरिकांनी दरीत उतरून जखमी आणि मयताला कार बाहेर काढत जखमीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले.
मूळचे थिटेसांगवी (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) (ह.मु. गेवराई) येथील अंबादास पांडुरंग उगले हे गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे चुलत सासरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेवराई येथून ते कडा (ता.आष्टी) येथे पत्नी सगुणा अंबादास उगले (वय 40 वर्षे) यांच्यासह फोर्ड कंपनीच्या कारने (क्रमांक एमएच-23 एडी-0249) निघाले होते. बीडसांगवी घाटात आले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने अंबादास उगले यांचा गाडीवरील ताबा सुटला व कार थेट दरीत कोसळली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अंबादास उगले यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सगुणा अंबादास उगले या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सुरवातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, बीडसांगवीचे सरपंच नंदकिशोर करांडे, संपत ढोबळे,विकास साळवे, दीपक कासवा,गणेश करांडे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच जखमीला पुढील उपचारांसाठी हलविण्यासाठी मदत केली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव धनवडे, पोलिस बी.ए.वाणी आदींनी अपघात ग्रस्तांना मदत केली.