विजय वडेट्टीवारांची माहिती
मुंबई (रिपोर्टर)-राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातले शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात 1,555 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
काँग्रेससह राज्यातले विरोधी पक्ष सातत्याने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते विजय विडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत तब्बल 1,555 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावतील विभागात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या विभागात गेल्या 7 महिन्यांमध्ये तब्बल 637 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.