संत एकनाथांचे वंशज योगीराज महाराजांनी पिंपळनेरकरांना केले मंत्रमुग्ध
पिंपळनेर (रिपोर्टर)- संत महंतांच्या स्पर्शाने पुणीत झालेल्या महाराष्ट्रात वैचारिकतेचे अधिष्ठाण सातत्याने पहावयास मिळते. आशापुरक आणि सिद्धीविनायकाच्या पावन भूमीत चरखा व सिद्धीविनायक परिवाराने गेल्या तीन वर्षांपासून शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या कर्तव्य कर्माचे अधिष्ठाण त्यांचेच पंधरावे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांच्या वाणीतून पिंपळनेरकरांसमोर मांडले. ते वैचारिक अधिष्ठाण आणि श्रीसंत एकनाथ महाराजांचे चरित्र सांगताना ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांनी संतांचा महिमा आणि गोतवळा ही आपली सर्वात मोठी श्रीमंती असल्याचे सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळामध्ये वैचारिकतेचे अधिष्ठाण असावे, याकरिता दिलीप चरखा व डॉ. शिवप्रसाद चरखा यांच्या माध्यमातून शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या चरित्राचे त्रिदिवसीय प्रवचन मालेचे आयोजन पिंपळनेर येथील सिद्धीविनायक मंदिरात करण्यात आले होते. महाराजांचे चरित्र त्यांचे पंधरावे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांच्या वाणीतून होत असल्याने पिंपळनेर येथील भावी मंत्रमुग्ध होताना दिसून आले. आज ह.भ.प. योगीराज महाराजांनी समाप्तीचे कीर्तन केले. या वेळी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रावर त्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले, विविध कालखंडातील संतांनी स्वतःपेक्षा समाजाचं हित जोपासले, अध्यात्माचा आधार घेत भक्तिविचार रुजवला. जात, धर्म, पंथांमध्ये विभागला गेलेला समाज एकसंध राहावा
ही भावना त्यामागे होती. त्यामुळेच समाजाच्या घडणीत संतांचे कार्य युगप्रवर्तक ठरले आहे. संत एकनाथ याच मांदियाळीतील एक महत्त्वाचे संत. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून संत एकनाथांनी मांडलेला भक्तिविचार परिणामकारक ठरला. त्या काळातील परकीय आक्रमणे व दहशतीमुळे भयभीत झालेला समाज एकत्र आला. आचार धर्मामुळे ही वीण अधिक घट्ट होत गेली. विचार आणि कार्याने संघटन वर्तुळ विस्तारत गेले आणि या विस्तारण्यात संत एकनाथांचे विचार दिशादर्शक ठरले.अन्न, वस्त्र आणि निवार्यामुळे जगण्याचा प्रश्न सुटतो. मात्र, विधायक विचार का जगायचं, हे शिकवितात. नेमके हेच विचाररुपी धन नाथांनी समाजाला दिले. यामुळे सामान्य माणसाच्या जगण्याला अर्थ आला, त्याला उभारी मिळाली. त्याच्या मरगळलेल्या मनाला नवआशावाद जागृत झाला. भक्तीची दृष्टी विकसित होत गेली. नाथांना सामान्य माणसाबद्दल प्रचंड कळकळ होती. त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांना समजेल, असे विचार सांगावे याची त्यांना जाणिव होती. म्हणून त्यांनी संस्कृत प्रचुरतेत अडकलेली भक्ती सामान्यांच्या दैनदिन भाषेत आणली. आत्मरुपाचा साक्षात्कार होऊन भक्तीचे ज्ञानकुंभ सर्वांना खुले केले. भक्ती विचाराच्या या उर्जेतून अंधारलेला समाज प्रकाशमय झाला. पंढरीच्या विठ्ठल नाम घोषात वैष्णवांचा मेळा व्यापक होत गेला.नाथांनी स्वतः दत्तसंप्रदायी गुरूकिल्ली स्वीकारली. मात्र, आयुष्यभर भागवत संप्रदायाचा वारकरी म्हणून ते वावरले. केवळ बोलून भागणार नाही, म्हणून त्यांनी हातात लेखणी घेतली. एकनाथी भागवत, अभंग गाथा, रुक्मिणी स्वयंवर, स्वात्मसुख, आनंदलहरी, हस्तामलक, चिरंजिवपद, भावार्थ रामायण, चतुःश्लोकी भागवत, शुकाण्टक, हरीपाठ आदी ग्रंथ या लेखणीतून साकारले. शिवाय गवळणी, भारुडे इतर स्फुट लेखनही त्यांनी केले. सामान्यातल्या सामान्य माणसालाही समज यावी व संत विचारांचे आचरण व्हावे, हा हेतू या लेखनामागे होता. जगण्याचा मूलमंत्रच त्यांच्या या साहित्याने दिला आणि समूहाची भाषा होऊन त्यांचे साहित्य अभिव्यक्त होत गेले. त्यामुळे त्यातील प्रतिबिंब आणि मूल्य प्रत्येकाला आपलं वाटलं. आजही नाथांच्या या साहित्याचं चिरंतनत्त्व कायम आहे.तीच बुद्धीची आणी साक्षरतेची श्रीमंती काल अनुभवायला मिळाली संत एकनाथांचे 15 वंशज ह भ प श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या मधुर वाणीतून महाराजांचे चरित्र श्रवण करता आले. संत एकनाथ यांची भौतिक श्रीमंती जेवढी त्या पेक्षा ज्ञानार्जन, अध्यात्म, यातील श्रीमंती पराकोटीची असल्याचे त्यांचे वंशज सांगत होते.